क्रिकेटपटू रहाणेने केले शेतकऱ्यांच्या कामाचे कौतुक

संगमनेर – क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे याने आपल्या शेतात जाऊन शेतीतील कामांची माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. त्याने हा व्हिडिओ ट्‌वीटरद्वारे शेअर केला असून, त्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

मूळचा नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यातील चंदनापुरी येथील असलेला भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्‍य रहाणे याने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्‍यातील आपल्या गावी चंदनापुरी येथे आलेल्या अजिंक्‍य रहाणे याने आपले चुलते सीताराम रहाणे यांच्या सोबत शेतात जाऊन सामान्य शेतकरी करत असलेल्या शेती कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर शहरातील तसेच देशातील नागरिकांना शेतकरी करत असलेल्या कष्टाची जाणीव करून देण्यासाठी एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियातून त्याने ही पोस्ट प्रसिद्ध केली आहे.

अजिंक्‍य हा स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, असे तो या व्हिडिओत सांगताना दिसतो आहे. आपल्या दैनंदिन जीवनात एका शेतकऱ्याचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे यावेळी अजिंक्‍यने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांप्रती अशाप्रकारे आपली कृतज्ञता व्यक्त करण्याने संगमनेर तालुक्‍यातील शेतकरी व सामान्य नागरिकांकडून अजिंक्‍यचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.