Ajinkya Rahane support Sanju Samson form : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका खिशात घातली असली तरी, संजू सॅमसनचा खराब फॉर्म सध्या संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. सॅमसन सलग तीन सामन्यांत अपयशी ठरल्याने त्याच्यावर टीका होत आहे. मात्र, अशा कठीण काळात भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे संजूच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. “मी संघातून इशान किशनला बाहेर ठेवीन, पण संजू सॅमसनला संधी देईन,” असे धक्कादायक पण स्पष्ट विधान रहाणेने केले आहे. संजू एक क्वालिटी प्लेयर! – रहाणेचा विश्वास ‘क्रिकबझ’शी बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, संजू सॅमसनकडे अफाट क्षमता आहे आणि केवळ काही सामन्यांतील अपयशामुळे त्याला संघाबाहेर काढणे चुकीचे ठरेल. “संजू हा एक दर्जेदार खेळाडू आहे. टी-२० फॉरमॅट असा आहे की, जर तुम्ही लवकर बाद झालात तर तुमचे खेळणे चुकीचे दिसते, पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्यावर नक्कीच विश्वास दाखवतील,” असे रहाणेने नमूद केले. इशान किशनला डच्चू देणार? जेव्हा तिलक वर्मा तंदुरुस्त होऊन संघात परत येईल, तेव्हा प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला बाहेर बसावे लागेल? यावर रहाणेने आपले स्पष्ट मत मांडले. तो म्हणाला, “तिलक आल्यावर माझ्यासाठी इशान किशन बाहेर बसेल आणि संजू सॅमसन संघात कायम राहील. संजूने पुढील दोन सामन्यांत धावा केल्या नाहीत तरीही तो माझ्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल.” संजूला रहाणेचा मोलाचा सल्ला – अजिंक्य रहाणेने संजू सॅमसनला दिला खास सल्ला संजूने लयीत येण्यासाठी काय करावे, यावरही रहाणेने मार्गदर्शन केले. “संजूने सुरुवातीचे दोन ओव्हर खेळून काढले पाहिजेत आणि क्रीजवर वेळ घालवला पाहिजे. एकदा नजर स्थिरावली की तो कोणत्याही गोलंदाजीवर आक्रमण करू शकतो. या फॉरमॅटमध्ये स्वतःवर विश्वास ठेवून पूर्ण स्वातंत्र्याने खेळणे महत्त्वाचे आहे,” असा सल्ला रहाणेने दिला. हेही वाचा – Abhishek Sharma Superstition : बसमधील ‘त्या’ सीटचा चमत्कार! अभिषेकने का बदलला आपला नंबर? रेकॉर्डब्रेक खेळीनंतर खुलासा पुढील दोन सामने ठरणार निर्णायक – २८ जानेवारीला विशाखापट्टणम येथे होणारा चौथा टी-२० सामना संजू सॅमसनसाठी अस्तित्वाची लढाई असेल. जर येथे त्याने धावा केल्या, तर टी-२० वर्ल्ड कपसाठी त्याचा दावा मजबूत होईल. मात्र, सलग अपयश आल्यास निवड समितीला वर्ल्ड कपच्या दृष्टीने कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो.