अजॉय मेहता यांना पुन्हा 3 महिने मुदतवाढ 

मुंबई – राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना आज पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील करोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर मेहता यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

अजॉय मेहता यांना 1 एप्रिल ते 30 जून अशी 3 महिने मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजॉय मेहता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही सूर जुळवून घेतल्याची प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशासकीय सेवेत दोनदा मुदतवाढ मिळणारे अजॉय मेहता हे पहिले मुख्य सचिव आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुख्य सचिव अजॉय मेहता यांना पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्याबाबतच्या राज्य सरकारच्या शिफारसीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. या आधीच निवडणूक कालावधीत मेहता यांना 6 महिने मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि मेहता यांचे सूर चांगले जुळले असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, सप्टेंबर 2019 मध्ये मेहता यांना 6 महिने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर मार्च अखेरीस मुदत संपणार होती. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएसआरडीसी एमडी राधेशाम मोपलवार यांनाही मुदतवाढ दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.