केजरीवालांचे कौतुक आले अंगलट
त्यावर देवरांनीही दिली तिखट प्रतिक्रीया
नवी दिल्ली – दिल्लीत आम आदमी पक्षाने जो दणदणीत विजय मिळवला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करणे कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्या या ट्विटर संदेशाला दिल्लीचे कॉंग्रेसचे नेते अजय माकन यांनी जोरदार आक्षेप घेतला असून आम आदमी पक्षाविषयी अर्धवट माहिती प्रसारीत करून त्यांचे कौतुक करायचे असेल तर देवरांनी कॉंग्रेस पक्ष सोडून द्यावा अशी जाहीर सूचना माकन यांनी त्यांना केली आहे.
मिलिंद देवरा यांच्या एका ट्विटर संदेशातून हा सारा प्रकार घडला आहे. त्या संदेशात देवरा यांनी म्हटले होते की, अरविंद केजरीवाल सरकारने आपल्या सरकारचे उत्पन्न दुपटीने वाढवून ते 60 हजार कोटी रूपयांच्यावर नेले आणि त्यांनी गेली पाच वर्षे शिलकी अंदाजपत्रक सादर केले.
दिल्ली हे आज देशातील अर्थिकदृष्ट्या उत्तम नियोजन करून चालवले जाणारे राज्य आहे असे देवरा यांनी आपल्या संदेशात म्हटले होते. त्यांच्या या संदेशाला दिल्लीतील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी जोरदार आक्षेप घेत त्यांनी म्हटले आहे की, जर मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून जायचे असेल तर त्यांनी बिनधास्त सोडून जावे आणि नंतरच त्यांनी असली अर्धवट माहिती प्रसारीत करावी.
यात माकन यांनी देवरांचा दावा खोडणारी आकडेवारीही सादर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सन 1997-98 साली दिल्लीचा महसुल 4073 कोटी रूपयांचा होता. 2013-14 साली कॉंग्रेसने तो 37459 कोटींवर नेला. म्हणजेच महसुलातील हीं वाढ कॉंग्रेसच्या काळात 14.87 टक्क्यांनी वाढली. सन 2015-16 मध्ये दिल्लीचा महसुल 41 हजार 129 इतका होता. तो 2019-20 मध्ये तो 60 हजार कोटींवर गेला. आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात हा वाढीचा दर केवळ 9.90 टक्के इतका होता असे त्यांनी देवरांच्या निदर्शनाला आणून दिले आहे.
तथापी मिलिंद देवरा यांनीही माकन यांना तितकीच तिखट प्रतिक्रीया देत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी शीला दीक्षित यांची कामगीरी कधीच अमान्य केलेली नाही. ते तुमचे (माकन) वैशिष्ट्य आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाशी युती करण्याचा आग्रह धरण्याऐवजी तुम्ही शीला दीक्षित यांच्या कामाचा प्रचार केला असता तर आज दिल्लीत कॉंग्रेस सत्तेवर असली असती असे देवरांनी त्यांना बजावले आहे.