अनाहुत मेसेज का रोखले नाहीत

एअरटेल, बीएसएनएल, जिओ, व्होडाफोन-आयडियाला ट्रायने ठोठावला दंड

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना होत आहे मनस्ताप

नवी दिल्ली – दूरसंचार नियामक अधिकारिणी म्हणजे ट्रायने अनाहुत मेसेज न रोखल्याबद्दल मोबाइल सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना 35 कोटी रुपयांचा दंड केला आहे. ज्या कंपन्यांना दंड करण्यात आला आहे त्यामध्ये एअरटेल, बीएसएनएल, जिओ, व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांचा समावेश आहे.

सायबर क्रिमिनलनी पाठवलेले बनावट मेसेज डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चौकशी करून ट्रायने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. एमटीएनएल, व्हिडिओकॉन, टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपन्यांनाही दंड करण्यात आला आहे. व्यावसायिक मेसेज ग्राहकांना पाठवू नयेत असा नियम आहे. मात्र, असे मेसेज पाठविल्याचे निष्पन्न झाल्यामुळे नियमानुसार हा दंड आकारण्यात झाला असल्याचे ट्रायने म्हटले आहे.

काही कंपन्यांनी आम्हाला हे मेसेज ब्लॉक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याची गरज आहे असे म्हटले आहे. तर काही कंपन्यांनी दंड देणार असल्याचे सूचित केले आहे. ट्रायने आपल्या माहितीत म्हटले आहे की, बीएसएनएल, व्होडाफोन -आयडिया, जिओ, एअरटेल या कंपन्यांनी अनाहुत मेसेजची संख्या चुकीच्या पद्धतीने सांगितली. याबद्धल ट्रायने तिव्र असमाधान व्यक्त केले आहे. दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या कामाबाबत आचारसंहिता बाळगणे गरजेचे असते. ग्राहकांना त्रास होणाऱ्या किंवा आर्थिक नुकसान होणाऱ्या मेसेजपासून ग्राहकांना संरक्षण देणे हे मोबाइल सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे काम असते. मात्र, सायबर क्रिमिनलनी स्वत:ला बॅंकांचे अधिकारी किंवा पेमेंट एक्‍झिक्‍युटिव्ह असल्याचे भासवून असे मेसेज डिजिटल पेमेंट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना पाठविले. 

हे मेसेज कंपन्यांनी वेळीच रोखण्याची गरज होती. मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या ग्राहकांना पाठविले जाणारे चुकीचे मेसेज रोखत नसल्यामुळे आमचे नुकसान झाले आहे असे पेटीएम कंपनीने म्हटले होते. या संदर्भात काही न्यायालयात सुनावणी चालू आहे.

कोणत्या कंपनीला किती दंड 

ट्रायने जारी केलेल्या माहितीनुसार बीएसएनएल कंपनीला सर्वाधिक म्हणजे 30.1 कोटी रुपयांचा, व्होडाफोन- आयडियाला 1 कोटी 82 लाख रुपयाचा, क्वाड्रॅंट कंपनीला 1 कोटी 41 लाख रुपयांचा तर एअरटेल कंपनीला 1 कोटी 33 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.