विमानतळ पुरंदरला आणि हरकती मुंबईला

प्रशासनाचा अजब कारभार; नकाशाही उपलब्ध नाही

सासवड – पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडा व नकाशा शासनाने प्रसिद्ध केला असला तरी याबाबतचा नकाशाच तहसील कार्यालयात उपलब्ध नाही. प्रशासनाने ज्या आराखड्यासंदर्भात हरकती मागवल्या आहेत, त्या हरकती देण्याकरिता मुंबई येथे असलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे विमानतळ पुरंदरला आणि हरकती मुंबईला…, असा अजब कारभार प्रशासनाचा असून या विरोधात पुरंदर तालुक्‍यातील सात गावांनी एकत्र येत पुरंदर विमानतळाला विरोध दर्शविला आहे.

सर्व निर्णय मुंबई येथील कार्यालयात घेतले जात असल्याने यासंदर्भात कोणतेही काम असेल तर मुंबई कार्यालयात जा, असे अधिकारी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना हरकतींसाठीही मुंबईला हेलपाटे मारावे लागत आहेत, विमानतळाला होणारा विरोध कमी करणे व शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी, अशा प्रकारे कारभार केला जात असल्याचा आरोप विमानतळविरोधी कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व बाधित शेतकऱ्यांनी केला असून प्रशासनाच्या या कारभाराचा जाहीर निषेध केला आहे.

पुरंदर तालुक्‍यात होणाऱ्या विमानतळाचा नकाशा कोणत्याही परिस्थितीत हा पुरंदर तहसीलमध्येच उपलब्ध करावा व सर्व हरकती या पुरंदर तहसील कार्यालयातच स्वीकारल्या जाव्यात, अशी आग्रही भूमिका विमानतळ बाधित गावातील शेतकऱ्यांनी मांडली असून याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.