खासगी जागा संपादनासाठी विभागीय आयुक्तांच्या सूचना
पुणे – लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली जागा खासगी व्यक्तींकडून संपादित करण्याबाबतची प्रक्रिया गतीने राबबावी, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापालिकेला दिले आहेत.
लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विस्तारीकरणासाठी आवश्यक जागा विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात येत नसल्याने हे काम रखडले आहे. जागा ताब्यात आली तर प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणे शक्य होणार आहे. यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाला आवश्यक जागा संपादनाबाबत बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, विमानतळ प्राधिकारणाचे अधिकारी उपस्थित होते.
विमानतळ प्राधिकरणाला लागणाऱ्या जागेबाबत महानगरपालिका आयुक्त राव यांनी तत्काळ निर्णय घ्यावेत. जागा शासनास हस्तांतरित करण्यास इच्छुक असणाऱ्या जागा मालकाचे संमतीपत्र करून घेऊन या जागेचा प्रचलित दरानुसार मोबदला लवकरात लवकर संबंधितांना देण्यात यावा, अशा सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी या बैठकीत दिल्या. महानगरपालिका स्तरावर होणारे निर्णय तत्काळ घ्यावे. तसेच अन्य निर्णय बाबतचा प्रस्ताव राज्य शासनासकडून येणाऱ्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करावी, असेही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.