वॉशिंग्टन – अमेरिकेतील सरकारने देशातील नागरिक आणि अन्य उद्योगांबरोबरच आपल्या देशातील अडचणीत आलेल्या विमान कंपन्यांसाठीही मदतीचे मोठे पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत हे पॅकेज जाहीर होईल. ते पुरेसे आणि या विमान कंपन्यांचे समाधान करणारे असेल असे त्यांनी म्हटले आहे. हे खूप मोठे पॅकेज असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
ही मदत देशासाठी, विमान कंपन्यांसाठी आणि एकूणच नागरिकांसाठी उपयुक्त व लाभदायी असेल असा दिलासाही त्यांनी दिला आहे.
अमेरिकन नागरिकांच्या मदतीसाठी अलिकडेच 2.2 ट्रिलियन डॉलर्सचे प्रचंड पॅकेज जाहीर केले होते एवढेच नव्हे तर त्या देशाने रोजगार निर्मिती कायम राहावी यासाठीही 50 अब्ज डॉलर्सची मदत तयार ठेवली आहे. त्याच आधारावर विमान कंपन्यांनाही मदत दिली जाणार आहे. तथापि या विमान कंपन्यांना कोरा चेक दिल्यास त्यातून करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याची टीका होईल ती टाळण्यासाठीचा पर्यायही ट्रम्प सरकार शोधत आहे. विमान कंपन्यांना थेट आर्िर्थक मदत करायची की त्यांचे शेअर्स तात्पुरत्या स्वरूपात विकत घेऊन त्यांच्या निधीची सोय करायची यावर विचार सुरू आहे. कोणत्या का मार्गाने होईना पण या विमान कंपन्यांना आता तातडीच्या पैशाची गरज भासत आहे.