सप्टेंबर 2019 पासून सलग पाचव्या महिन्यात गॅसची दरवाढ
नवी दिल्ली : विमानाचे इंधन अर्थात “एटीएफ’मध्ये आज 2.6 टक्क्यांची वाढ झाली. तर विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीमध्येही 19 रुपयांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याच्या अनुषंगाने ही वाढ करण्यात आली आहे.
विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती 695 रुपयांवरून 19 रुपयांनी वाढून 714 रुपये इतकी झाली आहे. सप्टेंबर 2019 पासून सलग पाचव्या महिन्यात ही गॅसची दरवाढ झाली आहे. या पाच महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये 139.50 रुपयांची वाढ झाली आहे.
त्याचप्रमाणे “एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ अर्थात “एटीएफ’या विमानांसाठीच्या इंधनाची किंमत प्रति किलोमीटर 1,637.25 रुपयांवरून 2.6 टक्क्यांनी वाढली. या इंधनाची किंमत आता दिल्लीमध्ये 64,323.76 प्रति किलोमीटर इतकी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतींमध्ये झालेल्या वाढीच्या अनुषंगाने सलग दुसऱ्या महिन्यात ही वाढ झाली आहे.
भारताला आपल्या तेलाची गरजेच्या 84 टक्के तेलाची आयात करावी लागते. देशांतर्गत इंधनाचे दर इंधनाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींच्या अनुषंगाने आहेत. विमानाच्या इंधनामध्ये 1 डिसेंबरला किरकोळ वाढ झाली होती. मात्र लागोपाठ दुसऱ्यांदा किंमतीत झालेल्या वाढीमुळे विमानाचे इंधन जून 2019 पासूनचे सर्वात महाग बनले आहे.
इंधनात झालेल्या या दरवाढीमुळे आगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या विमान कंपन्या अधिकच अडचणीत आल्या आहेत.
“एटीएफ’ आणि “एलपीजी’च्या किंमतींबाबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांच्या अनुषंगाने दर महिन्याच्या 1 तारखेला फेरआढावा घेण्यात येतो.