मंथन : एअर स्ट्राईकची रणनीती आणि परिणामांचा वेध

डॉ. शैलेंद्र देवळाणकर
परराष्ट्र धोरण विश्‍लेषक

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या एअर सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला एक कठोर दणका दिला आहे. भारताचा दहशतवाद प्रतिरोधनाचा एकूणच दृष्टिकोन बदलला आहे. अशा प्रकारे दहशतवादाचे प्रतिरोधन आपण आजवर करत नव्हतो. या हल्ल्याला प्रिएंटिव ऍटॅक म्हणतात. अशा प्रकारचे हल्ले अमेरिका, इस्राईलकडून केले जातात. भारताने ही पद्धती पहिल्यांदाच वापरली आहे. या हल्ल्यासाठीची एलओसीची निवड, बालाकोटाला लक्ष्य करणे हे सर्व अत्यंत सुनियोजित पद्धतीने आणि संभाव्य परिणामांचा विचार करून करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानची आता चहूबाजूंनी कोंडी झाली आहे.

अपेक्षेप्रमाणेच भारतीय लष्कराने प्रचंड मोठा दणका पाकिस्तानला दिलेला आहे. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजता भारताच्या 12 मिराज विमानांनी एलओसी पार करून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये प्रवेश केला आणि भारतीय एअरबेसपासून 300 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बालाकोट शहरामध्ये असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या सर्वांत मोठ्या प्रशिक्षण तळावर तुफान बॉम्बवर्षाव केला. तेथे 250 ते 300 दहशतवादी प्रशिक्षण घेत होते. हा तळ पूर्णतः बेचिराख करण्यात आला आहे. अपेक्षेप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे पाकिस्तानने असा हल्ला झाल्याचे नाकारले आहे. मात्र, भारताने हा हल्ला अत्यंत यशस्वीपणे केलेला आहे हे वास्तव आहे. या हल्ल्याला एअर सर्जिकल स्ट्राईक असे म्हणतात. उरीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आपण ग्राऊंड सर्जिकल स्ट्राईक केला होता. पुलवामावरील हल्ल्यानंतर 10 ते 12 दिवसांच्या काळानंतर ही कारवाई करण्यात आली. या काळात भारताने दीर्घकालीन धोरणे आखत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या एकटे पाडण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या कोंडी करण्यासाठी संयुक्‍त राष्ट्रसंघात मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी, तसेच सिंधू नदी पाणीवाटप करारातील भारताच्या वाट्याचे पाणी पूर्णतः वापरण्यासाठी यथायोग्य पावले उचलली. अल्पकालीन किंवा तत्काळ करावयाच्या कारवाईबाबतचे सर्वाधिकार लष्कराला दिले असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणाने पुलवामा हल्ल्यानंतर सांगितले होते.

हल्ल्याची तयारी

पुलवामावरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मदने स्वीकारल्यानंतर भारताने प्रत्युत्तराची तयारी सुरू केली होती. यासाठी एअर स्ट्राईकचा पर्याय निर्धारित केल्यानंतर त्यासाठी जवळपास 10 दिवस सर्व प्रकारची गुप्तचर माहिती गोळा केली गेली, जिथे हल्ला करावयाचा आहे तेथील स्थिती जाणून घेण्यात आली, तेथे सामान्य नागरिक नाहीत ना, त्यांना इजा पोहोचायला नको याचा विचार करण्यात आला आणि त्यानुसार धोरण ठरवण्यात आले. तसेच निर्धारित ठिकाणाची रेकी केली गेली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईला प्रेसिजन ऍटॅक किंवा लेजर गाईडेड मिसाईल ऍटॅक म्हणतात.

एलओसीच का?

या हल्ल्यासाठी आपण जाणीवपूर्वक एलओसी म्हणजेच ताबारेषेजवळच्या क्षेत्राची निवड केली. यासाठी मागील काळात केलेला सर्जिकल स्ट्राईकही एलओसीवरच केलेला होता. कारण हा भारताचाच भाग आहे. या हल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय सीमारेषेचा वापर केला नाही. कारण तेथे कोणतीही कारवाई केल्यास पाकिस्तानला संयुक्‍त राष्ट्र संघटनेमध्ये तत्काळ आवाज उठवून भारताने आमच्यावर हल्ला केल्याची तक्रार करण्याची संधी मिळाली असती. आता तसे करता येणार नाही. कारण हा हल्ला पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये झालेला आहे. हा मूळचा भारताचाच भाग आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघामध्ये हा भाग वादग्रस्त क्षेत्र म्हणून नोंदवलेला आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या हद्दीत आक्रमण केले असा दावा पाकिस्तानला करता येणार नाही. या सुनियोजित पावलामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे.

पाकिस्तान हतबल

दुसरा मुद्दा म्हणजे, भारताच्या या कारवाईचा पाकिस्तान स्वीकारही पूर्णपणाने करू शकणार नाही. कारण ज्याठिकाणी हा हल्ला झाला ते बालाकोट इस्लामाबादपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केला हे मान्य केल्यास जैश-ए-मोहम्मदचे हे तळ पाकिस्तानच्या मदतीनेच चालवले जात होते असे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध होईल. तसेच या हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकही मारले गेलेले नाहीत. तसे झाले असते तर पाकिस्तानला भारताविरुद्ध आरडाओरड करण्यास संधी मिळाली असती, पण तीही संधी पाकिस्तानला उरलेली नाही. म्हणूनच पाकिस्तानने सुरुवातीला असा हल्ला झाल्याचे नाकारले होते. भारतावर होणारे दहशतवादी हल्ले हे “नॉन स्टेट ऍक्‍टर्स’कडून होतात आणि त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही असे आजवर पाकिस्तान सांगत आला आहे, पण आता भारताची कारवाई मान्य केल्यास हे संबंध पाकिस्तानला नाकारता येणार नाहीत. त्यामुळे भारताच्या या एअर स्ट्राईकने दहशतवादी, पाकिस्तानी लष्कर, आयएसआय यांना कडक इशारा देतानाच त्यांची कोंडीही केली आहे.

अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्‍यांचा बागुलबुवा भेदला

1998 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांचे अण्वस्त्रीकरण झाले. यानंतर पाकिस्तानने सातत्याने या अणस्त्रांचा बागुलबुवा केला. दहशतवादी हिंसाचाराला प्रत्युत्तरादाखल भारताकडून पाकिस्तानवर एखादा जरी हल्ला झाला तरी आम्ही त्याविरोधात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो अशा धमक्‍या पाकिस्तान गेली 20-25 वर्षे सातत्याने देत आला आहे. या धमक्‍यांमुळेच आपण आजवर असंख्य हल्ले सहन करत राहिलो, पण त्यातून पाकिस्तानची तशी मानसिकताच बनत गेली. आपण हल्ले करत राहू आणि भारत सहन करत राहील असा पाकिस्तानचा समज बनत गेला. या समजाला, मानसिकतेला आता भारताने छेद दिला आहे. भारत आता ताकदीने कठोर पलटवार करू लागला आहे. अर्थात, अशा पलटवारांमुळे दहशतवादी कारवाया थांबतील असे नाही, पण आपण भारताविरोधात कुरघोडी केल्यास भारत गप्प बसणार नाही हा संदेश पाकिस्तान लष्कराला आणि आयएसआयला गेला आहे. तसेच जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दवा, हिज्बुल मुजाहिद्दीन आदी दहशतवादी संघटनांनाही यातून योग्य तो इशारा भारताने दिलेला आहे.

पारंपरिक युद्धाची शक्‍यता किती?

या एअर स्ट्राईकने बिथरलेला पाकिस्तान शांत बसणार नाही. तथापि, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्‍यता फार कमी आहेत. कारण भारत आणि पाकिस्तान दोन्हीही देश युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आजवर दोन्ही देशांत तीन पारंपरिक युद्धे झाली आहेत. या तिन्ही युद्धांत पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला आहे. तसेच या तिनही युद्धांमध्ये दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे नव्हती. आज दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. अलीकडेच पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी एक सूचक वक्‍तव्य केलेले होते. यातून त्यांनी भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा करणाऱ्या इम्रान खानला कानपिचक्‍या दिल्या होत्या. पाकिस्तानने एक अणुबॉम्ब टाकल्यास भारत 20 अणुबॉम्ब पाकिस्तानवर टाकेल असे ते म्हणाले होते. मुशर्रफ यांच्यासारख्या मुत्सद्दी नेत्याला भारताच्या सामर्थ्याची कल्पना आहे. तसेच या दोन्ही देशांत जर युद्धाचा भडका उडाला तर तो केवळ या दोन देशांपुरताच मर्यादित न राहता संपूर्ण दक्षिण आशिया, पूर्व आशिया, पश्‍चिम आशिया हे होरपळले जातील. त्यामुळे पाकिस्तान चुकूनही युद्धाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणार नाही. आता राहिला मुद्दा चीनचा. चीन आणि पाकिस्तानची मैत्री कितीही घनिष्ट असली आणि अगदी शीतयुद्धकाळापासून ती चालत आलेली असली तरीही भारताविरुद्धच्या तीनही युद्धांमध्ये चीन कधीही प्र्रत्यक्षपणाने पाकिस्तानच्या बाजूने उतरलेला नाही.

अप्रत्यक्षपणाने चीनने पाकिस्तानची बाजू उचलून धरली, पण प्रत्यक्ष युद्धात चीन कधीही पाकिस्तानच्या मदतीला आलेला नाही. आताही चीन पाकिस्तानच्या बाजूने उतरण्याच्या शक्‍यता फार कमी आहेत. तसेच भारताने गेल्या काही वर्षांत आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा केलेली असून अमेरिका, जपान या देशांशी भारताची मैत्री घनिष्ट बनत गेली आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत युद्ध झाले आणि चीन त्या युद्धात उतरल्यास अमेरिका, जपान हे देश भारताच्या बाजूने उभे राहतील. कारण सेनकाकू बंदरावरून जपानचा चीनशी प्रचंड वाद सुरू आहे. अमेरिकेचेही चीनशी व्यापारयुद्ध सुरू असून दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतावादावरून अमेरिका नाराज आहे. तसेच आशिया खंडात अमेरिका चीनचा काऊंटरवेट म्हणून भारताकडे पाहात आहे, याची पूर्ण कल्पना चीनलाही आहे. त्यामुळे चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या माध्यमातून अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केल्यामुळे चीन आपल्या पाठीशी राहील असे पाकिस्तानला वाटत असेल तर तो एक भ्रम ठरू शकतो. दुसरीकडे इस्लामिक देशही पाकिस्तानला मदत करतील असे नाही. तसेच आज मुळातच पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे.

अक्षरशः हातात कटोरा घेऊन पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी याचना करत फिरत आहे. अशा वेळी पाकिस्तानला युद्धाचा मार्ग निवडणेही आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. ऑक्‍टोबर महिन्यामध्ये फायनान्शियल ऍक्‍शन टास्क फोर्सचे पथक पुन्हा पाकिस्तानात जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यास पाकिस्तानला कोणीही आर्थिक मदत करणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दवा आदी दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करावी लागणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तान प्रत्यक्ष युद्धाचा मार्ग अवलंबण्याची शक्‍यता नाही. मग पाकिस्तान काय करेल? तर पाकिस्तान नेहमीप्रमाणेच अघोषित युद्धाचाच मार्ग अवलंबत राहील. म्हणूनच येणाऱ्या काळात भारतीय लष्कर, तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, पोलीस दले आणि जनतेला अत्यंत दक्ष राहावे लागणार आहे.


प्रतिरोधनाचा दृष्टिकोन बदलला

भारताचा दहशतवाद प्रतिरोधनाचा एकूणच दृष्टिकोन बदलला आहे. अशा प्रकारे दहशतवादाचे प्रतिरोधन आपण आजवर करत नव्हतो. या हल्ल्याला प्रिएंटिव ऍटॅक म्हणतात. याचा अर्थ, आपल्यावर भविष्यात होऊ शकणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना गृहित धरून ते थोपवण्यासाठी अथवा नष्ट करण्यासाठी केलेला हल्ला. अशा प्रकारचे हल्ले अमेरिका, इस्राईलकडून केले जातात. भारताने ही पद्धती पहिल्यांदाच वापरली आहे. बालाकोटातील दहशतवादी तळामध्ये 250 प्रशिक्षित दहशतवादी होते. त्यांनी भविष्यात भारतात येऊन हिंसाचार घडवून आणलाच असता. त्यापूर्वीच आपण त्यांना कंठस्नान घातले.

पाकच्या समजाला छेद

पुलवामावरील हल्ल्याचा बदला घेण्याची घोषणा केल्यानंतर भारत पुन्हा एकदा जमिनीवरून सर्जिकल स्ट्राईक करेल अशी पाकिस्तानची धारणा होती. त्यामुळे पाकिस्तानने सीमारेषेवरील दहशतवादी तळ हलवले होते आणि त्यांना बालाकोटमध्ये ठेवले होते. हे ठिकाण उरीपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. इतक्‍या आतपर्यंत भारतीय सैन्य येईल असे त्यांना वाटले नव्हते, पण भारताने हवाई हल्ले केल्याने पाकिस्तानची चाल साफ फसली.

बालाकोटच का? बहावलपूर का नाही?

बालाकोटपेक्षाही बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचे मोठे प्रशिक्षण तळ आहे. तिथे दहशतवाद्यांचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण चालते. तेथे 350 एके-47 आणि दारुगोळा ठेवलेला आहे. पख्तुनवाजवळील बालाकोट हे सर्वांत मोठे भरतीचे ठिकाण आहे. जैश-ए-मोहम्मदचे सर्व दहशतवादी पख्तुनवामधून येतात. तिथून त्यांना पूँछजवळ असणाऱ्या बालाकोटमध्ये आणून भारतात घुसवले जाते. अशी साधारण कार्यपद्धती आहे. बहावलपूरमध्ये हल्ला केला असता तर सामान्य पाकिस्तानी नागरिक मारले जाण्याची शक्‍यता होती. म्हणूनच आपण बहावलपूरला बगल देऊन बालाकोटामध्ये हल्ले केले.

डिफेन्सिव डिफेन्सकडून ऑफेन्सिव डिफेन्सकडे

दुसरी गोष्ट म्हणजे आपण दहशतवादाबाबतचे आपले धोरण बदलले आहे. पूर्वी आपले धोरण डिफेन्सिव डिफेन्स असे होते. आता आपले धोरण ऑफेन्सिव डिफेन्स आहे. याचाच अर्थ आपण आपल्या रक्षणार्थ हल्ला करणे. आजवर भारताने स्वतःवर एक बंधन घालून घेतले होते. त्यानुसार भारत कधीही पहिल्यांदा हल्ला करणार नाही. मात्र, ताज्या कारवाईत भारताने प्रथम हल्ला केला आहे. त्यामुळे आपल्या आजवरच्या चौकटीला आपण छेद दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)