वॉशिंग्टन – पाकिस्तान हा दहशतवाद्यांना फक्त आश्रयच देत नसून त्यांना पोसण्यासही मदत करत आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठबळ देण्याचे तातडीने न थांबविल्यास एअर स्ट्राइक करण्यात येईल. तसेच दहशतवादी अड्डयांवर ड्रोन हल्ले करण्याचा आमचा अधिकार असल्याचे म्हणत अमेरिकेने निर्वाणीचा इशारा दिला आहे.
पेंटागॉनमध्ये झालेल्या संरक्षण विभागाच्या बैठकीत पाकिस्तानच्या कृत्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या मते, अल कायदासारख्या अनेक दहशतवादी संघटना सध्या पाकिस्तानात आहेत आणि ही गोष्ट खरोखर चिंतेची बाब आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, आणि गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांचा बंदोबस्त करु शकलेला नाही.
जॉन किर्बी म्हणाले की, पाकिस्तानने हे विसरु नये की तो अजूनही जगाच्या इतर भागात दहशतवाद पसरवण्यास जबाबदार आहे. अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ल्यांद्वारे दहशतवादाचा धोका कमी करण्याचा अमेरिकेला अजूनही अधिकार आहे. अमेरिकेचे सैन्य 20 वर्षांच्या युद्धानंतर निघून मायदेशी परतले असले तरी दहशतवाद्यांवर हल्ला करण्याचा अधिकार अजूनही अबाधित ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानशी असलेल्या आमच्या चिंतेबद्दल आम्ही नेहमीच प्रामाणिक आहोत. आजही हे सत्य कुणी नाकारु शकत नाही की पाकिस्तानच्या सीमा दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान आहेत. या सीमांवरील दहशतवादी संघटनांमुळे पाकिस्तानी लोकांनाही धोका आहे.
पाकिस्तान अल कायदा आणि इतर दहशतवाद्यांना जागा पुरवतो. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या अश्रफ गनी सरकारने आम्हाला अनेकदा सांगितले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान दहशतवाद्यांना वैद्यकिय सुविधा पुरवत असल्याचीही माहिती गनींनी दिली होती.