सातारा – सातारा शहरालगत असणार्या महामार्गावर वाढेफाट्याजवळ काॅन्स्टेंट अॅसिडची वाहतूक करणार्या पिकअप वाहनाला अपघात झाल्याने त्याठिकाणी वायुगळती झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईच्या दिशेने सातारा एमआयडीसीत काॅन्स्टेंट अॅसिड घेवून निघालेल्या पिकअप वाहनाला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाढेफाट्याजवळ आल्यानंतर अचानक गळती लागली.
चालकाने प्रसंगावधान राखून ट्रॅंकर महामार्गावर एका बाजूला उभा केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, वायुगळतीमुळे पिकअप वाहनाने पेट घेतल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान या वायुगळतीमुळे घटनास्थळी असलेल्या काही लोकांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने भितीचे वातावरण तयार झाले होते. महामार्गावर केमिकल पडल्याने त्यातून लालसर रंगाचा धूर बाहेर पडत असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात वायू घेऊन निघालेल्या पिकअप वाहनाचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.