एअर इंडियाच्या विक्री प्रस्तावाला “मुदतवाढ’ नाही

नवी दिल्ली – केंद्र सरकार एअर इंडियाची विक्री करण्यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करीत आहे. आता या कंपनीच्या विक्रीसाठी बोली बोलण्याची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपत आहे. यासाठी मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले.

भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी 43 कोटी 50 लाख लोकांनी विमानाने प्रवास केला. आगामी काळात हे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचे भविष्य आगामी काळातही उज्वल आहे, असा दावा त्यांनी केला. ही कंपनी भावी खरेदीदाराला जास्तीत जास्त उपयोगी ठरेल अशाच पद्धतीने सध्या एअर इंडियाचे नियंत्रण चालू आहे असे पुरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एअर इंडिया खरेदी करण्यासाठी देशातील आणि परदेशातील काही कंपन्यांनी इच्छा दर्शविली आहे. अनिवासी भारतीयांना या कंपनीत गुंतवणूक करता यावी याकरिता गेल्याच आठवड्यामध्ये नियमात बदल करण्यात आले आहेत. लॉकडाऊननंतर देशातील विमान सेवा काही प्रमाणात सुरू आहे. मात्र अजून ती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याशिवाय ही सेवा पूर्णपणे पूर्वपदावर येणार नाही, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.