एअर इंडीयाचा पाय आणखी खोलात :120 वैमानिकांचा राजीनामा

नवी दिल्ली : सरकारी एअरलाईन्स कंपनी एअरइंडीयाच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचे दिसत आहे. कारण अगोदरच कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या एअर इंडीयाला त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी झटका दिला आहे. कंपनीच्या तब्बल 120 वैमानिकांनी एकत्र राजीनामे दिले आहेत. वारंवार सांगूनही वेळेवर पगार आणि पदोन्नती न मिळाल्याने या सर्व वैमानिकांनी राजीनामे दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. एअरबेस ए-320 चे हे सर्व कर्मचारी असल्याचे म्हटले जात आहे.

केंद्र सरकारची ही कंपनी असून या कंपनीवर तब्बल 60 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यातच आता 120 वैमानिकांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने कंपनीचा पाय आणखी खोलात गेला आहे. कंपनीकडून आमच्या मागण्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आले. वेतन वाढ आणि पदोन्नती या दोनच मागण्या आम्ही कंपनीकडे केल्या होत्या परंतू, त्या पुर्ण न झाल्याने आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे वैमानिकांनी सांगितले. तसेच कंपनीकडून वैमानिकांसोबत पाच वर्षांसाठी करार करण्यात येतो परंतू, करारानुसार वैमानिकांना कमी पगार देण्यात येतो.

पगार वाढीचे कंपनीकडून केवळ आजपर्यंत आश्‍वासन देण्यात आले आहे. त्याची पुर्तता कंपनीकडून करण्यात आलेली नाही. आमच्या मागण्यांकडे कंपनीने दुर्लक्षच केले आहे त्यामुळे कंपनीच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैमानिकांनी सांगितले. तर दुसरीकडे वैमानिकांच्या राजीनाम्यामुळे विमानाच्या फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. तसेच कंपनीकडे सध्या 2 हजार वैमानिक असून त्यातील 400 वरिष्ठ वैमानिक असल्याचे एअर इंडीयाच्या प्रवक्‍त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.