नवी दिल्ली – रशियाच्या लष्करी हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावरून रोमानियाची राजधानी बुखारेस्टसाठी रवाना झाले. या विमानाने पहाटे 3.40 च्या सुमारास मुंबई विमानतळावरून उड्डाण केले आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 च्या सुमारास ते बुखारेस्ट विमानतळावर उतरणे अपेक्षित आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्त्याने युक्रेन-रोमानिया सीमेवर पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जात आहेत तेथून त्यांना एअर इंडियाच्या विमानातून मायदेशी नेता येईल. बुखारेस्ट बरोबरच हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथेही एअर इंडियाचे विमान पाठवले जाणार आहे. अशी अनेक विमाने तिकडे पाठवावी लागणार आहेत. कारण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे.
थेट युक्रेन मध्ये भारतीय विमान पाठवणे सध्या शक्य नाही. त्यामुळे युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये विमाने पाठवण्याचा पर्याय निवडण्यात आला असला तरी युक्रेन मधून शेजारील देशांत रस्त्याच्या मार्गाने जाणे भारतीयांसाठी एक अवघड आव्हान आहे, ते पेलणे सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही. त्यातच युक्रेनच्या ज्या भागात भारतीय अडकले आहेत तेथून अन्य देशांची सीमा अनेक किलोमीटर दूर आहे तीही एक मोठी समस्या आहे.
24 फेब्रुवारीच्या सकाळपासून युक्रेनने नागरी विमानांसाठी आपले विमानतळ बंद केले आहेत. म्हणूनच, बुखारेस्ट आणि बुडापेस्टमधून निर्वासितांसाठी उड्डाणे सुरू आहेत. युक्रेन मध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय अडकले आहेत असे सांगण्यात येते. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी सांगितले आम्ही रोमानिया आणि हंगेरीमधून निर्वासितांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.