सरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

पुढच्या महिन्यात सरकार निविदा मागवण्याची शक्‍यता

नवी दिल्ली : कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची विक्री प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. विक्री प्रक्रियेसाठी सरकार पुढील महिन्यात यासंदर्भात निविदा मागवण्याची शक्‍यतादेखील वर्तवली आहे. ज्या कंपन्यांना एअर इंडियाच्या खरेदीमध्ये रस असेल त्या कंपन्यांना खरेदीपूर्वी निविदा भराव्या लागणआर आहेत. यापूर्वी काही कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीत रस दाखवला होता.

या महिन्याच्या अखेरिसही लिलावाची प्रक्रिया पार पडू शकते, अशी शक्‍यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. यासाठी ई-निविदा प्रक्रियेचा वापर करण्यात येणार आहे. सरकार सध्या एअर इंडियाचा 100 टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एअर इंडियाच्या कर्मचारी संघटना या प्रस्तावाला विरोध करत आहेत.

एअर इंडियावर सध्या 58 हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या एअर इंडियाला 2018- 2019 या आर्थिक वर्षात 8 हजार 400 कोटी रूपयांचा तोटा झाला होता. ऑपरेटिंग कॉस्ट आणि फॉरेन एक्‍सचेंज लॉसमुळे एअर इंडियाला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे एअर इंडियाला विमानाच्या इंधानाचे पैसे भरणेही कठिण झाले आहे. अशातच इंधन कंपन्यांनी एअर इंडियाला इंधनाचा पुरवठा रोखण्याची धमकीदेखील दिली आहे.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात इंडियन ऑईल आणि अन्य दोन कंपन्यांनी एअर इंडियाने थकीत रक्कम न भरल्याने एअर इंडियाच्या 6 विमानतळांवरील इंधन पुरवठा बंद केला होता. पुणे, विशाखापट्टणम, कोची, पाटणा, रांची आणि मोहाली विमानतळासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एअर इंडियाने 5 हजार कोटींची थकीत रक्कम न भरल्याने कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.