“इस्रो’च्या चांद्रयान-2 मोहिमेला हवाई दलाचे बळ

– अंतराळात आवश्‍यक “जीवसुरक्षा प्रणाली’संदर्भात संयुक्‍त प्रयत्न
 
पुणे – अंतराळात मानव पाठवण्यासंदर्भातील मोहिमेत (चांद्रयान-2) भारतीय अंतराळ संशोधन “इस्रो’ अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि हवाई दल यांच्यातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर कृती आराखडा लवकरच निश्‍चित केला जाणार आहे. यासाठी “इस्रो’सोबत चर्चा सुरू असून बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसिन (आयएएम) येथे अंतराळात मानवासाठी आवश्‍यक “जीवसुरक्षा प्रणाली’संदर्भात काम केले जाणार आहे.

येथील लष्करी महाविद्यालयातर्फे 67व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. या परिषदेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी ही माहिती दिली. यावेळी लेफ्ट. जन. (लष्कर) मनोमोय गांगुली, व्हाईस ऍडमिरल (नौदल) अनूप बॅनर्जी, लेफ्ट. जन. (हवाई दल) राजवीर सिंग, लेफ्ट. जन. व्ही. के. शर्मा, लेफ्ट. जन. आर.एस. ग्रेवल, लेफ्ट. जन. एम. व्ही. सिंग., एअर मार्शल आर. के. राणा उपस्थित होते.

पुरी म्हणाले, “अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. “इस्रो’कडून लवकरच चांद्रयान-2 पाठविले जाणार आहे. यावेळी अंतराळवीरांना होणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत संशोधन आणि उपाय याबाबत सविस्तरपणे विश्‍लेषण गरजेचे आहे. यासाठी हवाई दलाचे इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसीनसोबत काही बैठक घेण्यात आल्या आहेत. संस्थेतर्फे आंतराळवीरांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. मानवी जीवरक्षक प्रणालीबाबत विशेष भर असणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसीन संस्थेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असल्याने “इस्रो’कडून संस्थेची निवड करण्यात आली आहे.’
 
मित्रराष्ट्रांसोबत करणार वैद्यकीय संशोधन
वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक संशोधनासाठी देशातील नामांकित रुग्णालय आणि वैद्यकीय संस्था तसेच मित्र राष्ट्राशी याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने आणि त्यावरील उपायांबाबत संशोधन करण्यात येत आहे. आशियातील मित्रराष्ट्रांसोबत 8 ते 16 मार्चदरम्यान आपत्कालिन परिस्थितीत एकत्रित काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 18 देशांनी सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. तर निरीक्षक म्हणून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)