नवी दिल्ली : भारत आणि कतारने दोन्ही देशांमधील व्यापार आगामी ५ वर्षात दुपटीने वाढवून २८ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. भारत दौऱ्यावर आलेले कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल-थानी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध धोरणात्मक बागीदारीच्या पातळीपर्यंत वाढवण्याचेही निश्चित करण्यात आले.
पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमिर यांच्या उपस्थितीत आज दोन करारांवर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या. यातील एक धोरणात्मक बागीदारीशी संबंधित असून दुसरा करार दुहेरी करार टाळण्याशी संबंधित आहे. आर्थिक भागीदारी सक्षम करण्यासाठी पुरातत्व व्यवस्थापन आणि युवकांशी संबंधित व्यवहार आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्याबाबत ५ सामंजस्य करार देखील करण्यात आले.
सध्या असलेल्या द्विपक्षीय संबंधांची उंची वाढवून धोरणात्मक भागीदारीचे संबंध प्रस्थापित केले जाणार आहेत. यामुळे व्यापार, उर्जा, सुरक्षा तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य अधिक सखोल करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अरुण कुमार चॅटर्जी यांनी पत्रकारांना सांगितले. मोदी आणि कतारच्या अमीर यांनी पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार सध्याच्या १४ अब्ज डॉलर्सवरून २८ अब्ज डॉलर्सपर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य निश्चित करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या कतार दौऱ्यादरम्यान कतारमधून आणखी २० वर्षांसाठी, २०४८ पर्यंत एलएनजी आयात करण्यचा ७८ अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. ही आयात तत्कालिन दरांच्या तुलनेत स्वस्त असणार आहे. मोदी आणि अमीर यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि लोकांमधील संबंधांवर लक्ष केंद्रित करून विस्तृत चर्चा केली.
त्यामुळे दोन्ही देशांमधील “खोल आणि पारंपारिक संबंध” आणखी मजबूत झाले. याशिवाय प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील परस्परांच्या हितांच्या महत्वाच्या मुद्यांवरही त्यांनी आपल्या विचारांचे आदान प्रदान केले. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कतारच्या अमिराचे राष्ट्रपती भवनात औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला मोदी देखील उपस्थित होते.
दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संबंध…
भारत आणि कतार यांच्यात मैत्री, विश्वास आणि परस्पर आदराचे खोलवर रुजलेले ऐतिहासिक संबंध आहेत. . अलिकडच्या काळात, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि लोकांमधील संबंध या क्षेत्रांसह दोन्ही देशांमधील संबंध दृढ होत आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने आधी म्हटले होते. कतारचे अमीर सोमवारी संध्याकाळी येथे पोहोचले. मोदींनी फेब्रुवारी २०२४ मध्ये कतारला भेट दिल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर त्यांचा हा दौरा येत आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्ली विमानतळावर मोदींनी आमिरचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमधील सौहार्दपूर्ण संबंध दाखवून त्यांनी त्यांचे स्वागत केले.