‘डेल्टा प्लस’बाबत एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया यांचे दिलासा देणारे विधान

नवी दिल्ली – करोनाचा विषाणू आपले स्वरूप बदलत असल्यामुळे लस घेतल्यानंतरही करोना होणार नाही याची खात्री काय, असे सवाल उपस्थित केले जात आहते. करोनाच्या डेल्टा प्लस या नव्या अवताराची विशेष धास्ती घेण्यात आली आहे. केंद्रानेही डेल्टा प्लसची चिंतेचा विषय अशी वर्गवारी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलासा देणारे विधान केले आहे.

करोनाविषयक नियमांचे आपण योग्यरित्या पालन केले तर आपण करोना विषाणूच्या कोणत्याही स्वरूपापासून सुरक्षित राहू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. गुलेरिया यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, डेल्टा प्लसचा संसर्ग अधिक वेगाने होतो. त्याच्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या अधिक आहे किंवा या विषाणूनेच स्वत:ला लसीपासून वाचवणारे कवच तयार केले आहे अशा प्रकारची कुठलीही ठोस माहिती अजूनतरी प्राप्त झालेली नाही.

दरम्यान, लसींचे मिश्रण अधिक प्रभावी ठरू शकते अशाही बातम्या गेल्या काही दिवसांत आल्या आहेत. त्यावरही गुलेरिया यांनी खुलासा केला असून याबाबत अधिक माहिती आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, ही एक रणनीती असून त्याचा वापर केला जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या स्वरूपाची ओळख 11 जून रोजी प्रथम निदर्शनास आली व आतापर्यंत 12 देशांत हा विषाणू सापडला आहे. भारतातही राजस्थान, जम्मू-काश्‍मीर, ओडिशा, तमिळनाडू आणि कर्नाटकसह 12 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात डेल्टा प्लसची प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत 45 हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात डेल्टा प्लसची 51 प्रकरणे आढळून आली आहेत. महाराष्ट्रात त्याच्या जास्त केसेस आढळल्या असून त्यानंतर मध्य प्रदेश आणि केरळमध्येही रुग्ण आढळले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.