अहमदनगर – मागच्या अडीच ते तीन वर्षापासून आमदार बबनराव पाचपुते यांचा प्रतिनिधी म्हणून श्रीगोंदा मतदारसंघात काम करत आहे. माजीमंत्री पाचपुते यांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली, त्यातून जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली. बबनदादा मला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी मला कायम उपलब्ध असणार असल्याने भविष्यात अडचणी येणार नाहीत. मतदारसंघातील रस्ते, वीज व पाणीप्रश्न सोडविण्यावर माझा प्रथम भर राहणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन केल्याची माहिती नवनिर्वाचित युवा आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी दिली.
श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी दैनिक प्रभात कार्यालयास सदिच्छा भेट संवाद साधला. निवासी संपादक जयंत कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपसंपादक मुरलीधर तांबडे, हेमंत मिसाळ यांच्यासह सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आ. पाचपुते यांनी समर्पक उत्तर देत आगामी वाटचालीचा रोडमॅप मांडला.
बबनदादा आजारी असल्याने त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्यावर जबाबदारी आली. दादा ४५ वर्षे आमदार असल्याने त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षापासून मतदारसंघासह मंत्रालयात जाऊन विविध कामांचा पाठपुरावा मी केला. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यसह मतदारसंघातील विविध कामे मंजूर करून आणली. मी आमदार झाल्यानंतर बबनदादा यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी माझ्यासोबत असल्याने मला काम करताना काहीच अडचण येणार नाही.
विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून साकळाइचा मुद्दा उपस्थित केला गेला. कृती समितीकडून ओव्हरफ्लोच्या पाण्याची मागणी केली जात आहे. वास्तविक आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये आपल्याकडील तलावात पाणी असते. त्यामुळे हे ओव्हरफ््लोचे पाणी उचलून टाकणार कुठे असा प्रश्न असून, सर्वेक्षणात बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू असून, साकळाइचा पाणीप्रश्न योग्य पद्धतीने सोडविण्याचा माझा भर राहणार आहे. विरोधकांना साकळाइ चारी पूर्ण झाली तर मुद्दा राहणार नसल्याने त्यांचे राजकारण चालू आहे.
श्रीगोंदा हा पर्जन्यछायेत येत असल्याने पुरेसा पाऊस झाला नाहीतर पाणीप्रश्नाची समस्या निर्माण होते. अशावेळी घोड, कुकडीचे आवर्तन वेळेवर मिळाल्यास अडचण येत नाही. मात्र, धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यास अडचण येऊन नियोजन बिघडते. परिणामी शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे खापर लोकप्रतिनिधीवर फोडले जाते. त्यामुळे घोड, कुकडीतून आवर्तनाच्या प्रश्नाचे योग्य पद्धतीने नियोजन करून सोडविण्यावर माझा भर राहणार आहे. जेणेकरून जनतेचा फायदा होइल.
आमदार झाल्यानंतर आपले प्रथम प्राधान्य रस्ते, वीज, पाणी व बेरोजगार या प्रश्नाला असणार आहे. त्यादृष्टीने व्हिजन तयार करण्यात आले आहे. श्रीगोंदे एमआयडीसाठी शेती महामंडळाचे ६२२ एकर क्षेत्र एमआयडीसीला मिळाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मा.खा.खासदार सुजय विखे पाटील यांचा यात सिंहाचा वाटा आहे. एमआयडीसी झाल्याने याठिकाणी नवीन उद्योग येणार असल्याने बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. हाय पाॅवर कमिटीकडे हे प्रकरण गेले असून, यास मंजुरी मिळाल्याने एमआयडीसीला प्रत्यक्षात मूर्त रुप येणार आहे. घोड, कुकडी, १२३ चारी, १३ नंबर चारी यांच्या अस्तरीकरणाचा निविदा निघाली असून, आचारसंहिता संपल्याने प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे. ज्याचा मतदारसंघातील शेतकऱ्यांना फायदा होऊन पाणी गळती थांबून आवर्तन वेळेवर मिळण्यास मदत होइल.
उमेदवारी बदलण्याचा निर्णय योग्यच
माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे पक्षाने प्रतिभाताइ पाचपुते यांना उमेदवारी दिली होती. मात्र, दादांच्या तब्येतीसाठी प्रतिभाताइ यांनी सदैव त्यांच्यासोबत रहावे लागत असल्याने उमेदवारी बदलण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची मुंबइत भेट घेतली होती. दादांच्या प्रकृतीच्या कारणास्त्रव आइने माघारी घेतल्याने मला उमेदवारी मिळाली. यात चूक माझी होती. पक्षाने ज्यावेळी विचारणा केली होती तेव्ही मी आइचे नाव सुचविले होते. मात्र, आइने दादांचे आरोग्य महत्त्वाचे असलयाने पत्नी म्हणून मला त्यांच्यासाठी थांबावे लागेल, असे सांगितलले. उमेदवारी बदलण्याचा निर्णय योग्यच होता हे मला मिळालेल्या मताधिक्यातून स्पष्ट झाल्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले.