शेवगाव – शेवगावकरांना लवकरच दररोज पाणी दिल्याचे समाधान मला लाभणार आहे. या योजनेची संकल्पना २०१७ मध्ये राजीव राजळे यांनी मांडली होती, ती आता पूर्णत्वास आली आहे. चांगले काम केल्याचे समाधान यामुळे मिळणार आहे. मात्र, निवडणुका आल्यावर कामाचा श्रेयवाद उफाळून येतो. ज्याच्या अधिकारात जे काम आहे , ज्याची जी पात्रता आहे, त्यांनी ते काम केले पाहिजे. परंतु ज्याचा नगरपरिषदेशी काडीचा संबंध नाही व योजनेच्या पाठपुराव्याची काहीही माहिती नाही, अशांनी कामाचे श्रेय घेऊ नये, असा सल्ला आ. मोनिका राजळे यांनी विरोधकांना दिला.
शेवगाव शहरासाठी ७२ कोटी ५० लक्ष खर्चाची पाणी पुरवठा योजना व ४ कोटी ४२ लक्ष खर्चाच्या २५ विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी बापूसाहेब भोसले, भिमराज सागडे, ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, माजी नगरसेवक सागर फडके, महेश फलके, गणेश कोरडे, शहराध्यक्ष बापू धनवडे, शिवसेनेचे आशुतोष डहाळे, साईनाथ आधाट,वाय.डी.कोल्हे, राजभाऊ लड्डा ,रवींद्र सुरवसे, गणेश रांधवणे, कमल खेडकर, आशा गरड, तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्यासह शहरातील महिला व नागरीक उपस्थित होते.
आ. राजळे म्हणाल्या , येथील पाणी पुरवठा योजनेनंतर आता शहरातील २०० कोटींचा भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. तिसगाव ते पैठण या चारपदरी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामही सुरू होत आहे. ही योजना करताना शेवगावकरांना कोणी नारळ फोडले, याचा संभ्रम राहिलेला नाही. मात्र २०१४ पासून जो नारळ फोडला त्याचे काम झालेले दिसणार आहे. बदललेले सरकार तसेच नगरपरिषदेची फसवणूक करणारा ठेकेदार यामुळे अडथळ्याची शर्यत पार पाडत असताना नव्याने टेंडर प्रक्रिया करून आता प्रत्यक्षात या योजनेच्या कामास सुरुवात होणार आहे. २०१४ पासून तुम्ही मला आशीर्वाद दिला, असाच भविष्यात सुद्धा सर्वांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन आ.राजळे यांनी केले.
प्र . मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी शेवगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सविस्तर माहिती दिली.आगामी २५ ते ३० वर्षाचे नियोजन गृहीत धरून पुढील २०५१ साली शहराची सुमारे लोकसंख्या ९० हजार गृहीत धरून पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आल्याचे ते म्हणाल. योजनेचे ठेकेदार स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कोल्हापूरचे प्रतिनिधी श्रीधर म्हस्के यांना योजनेचा कार्यारंभ आदेश तहसीलदार प्रशांत सांगडे व मुख्याधिकारी लांडगे यांच्याहस्ते देण्यात आले. प्रास्ताविक मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी केले, राजू सुरवसे यांनी सूत्रसंचलन केले तर माजी नगरसेवक सागर फडके यांनी आभार मानले.