कोपरगाव -निळवंडे धरणाचे पाणी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहचावे, यासाठी रांजणगाव देशमुख या ठिकाणी गेली तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर, पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या मध्यस्थीने लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव व लघु बंधारे भरून देणे तसेच यासाठी येणाऱ्या अडचणी प्रशासकीय पातळीवर सोडविल्या जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजता उपोषण स्थगित केले.
निळवंडे लाभक्षेत्रातील तालुक्यातील गावे द्वितीय चाचणीच्या प्रथम आवर्तनामध्ये वंचित राहिले होते. ते भरून मिळावे तसेच पाझर तलाव भरताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्या, संघर्षातील खोटे गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यासाठी गेली तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. या उपोषणासाठी ऍड. योगेश खालकर, डॉ.अरूण गव्हाणे, सरपंच आण्णासाहेब गांगवे, कैलास रहाणे, गजानन मते, संजय बर्डे आदी शेतकरी प्रातिनिधीक स्वरूपात बसले होते. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले. तरीही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र उपोषणकर्ते अँड. खालकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके, तहसिलदार संदीपकुमार भोसले, शिर्डीचे पोलीस निरीक्षक संदीप शिरसाठ, निळवंडेचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. नियोजनाची बैठक लावून अधिकाऱ्यांच्या नियोजनात पाझर तलाव भरले जातील असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला व लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले.