पीडितांचा उपोषणास बसण्याचा इशारा, मठाचीवाडीत मागील भांडणाच्या कारणावरून हल्ला
शेवगाव – तालुक्यातील मठाचीवाडी येथील सहा जणांनी मागील भांडणाच्या कारणाहून मुलाला कुऱ्हाड व घातक हत्याराने डोक्यामध्ये व शरीरावर इतर ठिकाणी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत १५ नोव्हेंबररोजी शेवगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही. खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरीत अटक करून आम्हाला न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन सोमनाथ शिवाजी घुणे यांनी पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील यांना दिले आहे.
मागील भांडणाच्या कारणाहून दि. १३ नोव्हेंबर रोजी मुलगा सचिन सोमनाथ घुणे यास मच्छिंद्र नामदेव घुणे, वामन मच्छिंद्र घुणे, निर्मला गणेश घुणे, गणेश लहानू घुणे, विकास मच्छिंद्र घुणे, भिमराज काशिनाथ काकडे (सर्व रा. मठाचीवाडी ता. शेवगाव) यांनी कुऱ्हाड व घातक हत्याराने डोक्यात व इतर शरीरावर मारहाण केली.
तसेच पुतण्या ऋषिकेश व पत्नी मिराबाई यांना ही लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीत सचिन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात वरील सहा जणांविरुध्द १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. सर्व आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही.
फिर्याद मागे घ्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारून टाकू, पोलीस आमचे काहीच करू शकत नाहीत, अशा धमक्या ते देत आहेत. त्यामुळे आमच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन आम्हाला न्याय दयावा, अन्यथा सोमवार दि.२ डिसेंबरपासून शेवगाव पोलीस ठाण्यासमोर कुटुंबांसह अमरण उपोषण करणार आहोत. निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पाठवली आहे.