पारनेर – पारनेर येथे झालेल्या महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी तालुक्यातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांकडून पैसे जमा करण्यासंदर्भातची ऑडिओ क्लिप सध्या वायरल होत असून, त्यामध्ये प्रत्येक कार्यालयातून १० ते २० हजार रुपये जमा करण्याच्या सूचना तहसीलदार सौंदाणे या अधिकाऱ्यांना करत त्यात आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या ऑडिओ क्लिपशी माझा संबंध नाही, त्यातील आवाज माझा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या ऑडिओ क्लिपमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गायत्री सौंदाणे यांची पारनेर तालुक्यातील कारकीर्द वादग्रस्त ठरत आहे. यापूर्वी त्यांनी थम व इतर कागदपत्रांसाठी कार्यालयातील एजंटमार्फत पैशांची मागणी केली असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच थेट महसूलमंत्र्यांच्या पारनेर येथे झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी पंचायत समिती, नगरपंचायत, कृषी विभाग, पशुवैद्यकीय विभाग आदी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वसुलीसाठी सूचना केल्या. पैसे त्वरित जमा करावे, असे सुनावले असल्याचे क्लिपमधील आवाजात आहे. यात एका अधिकाऱ्याने शासकीय अनुदान नाही का असे म्हटल्यावर त्यांनी यासाठी कोणतेही अनुदान येत नाही. आम्ही मागच्या वेळेस आमच्या पगारातूनच पैसे घातले आहेत, त्यासाठी कोणते अनुदान येत नाही, असे सांगितले.
यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ही मागणी केली गेली. या कार्यक्रमासाठी मंडप, बुके, सत्कार आदींसाठी खर्च आहे. त्यासाठी आपल्याला पैसे गोळा करावेच लागतील. ज्यांना पैसे गोळा करायचे नाही, त्यांनी जबाबदारी वाटून घ्यावी. शासनाकडून कोणतेही अनुदान येत नसल्याचे देखील या व्हिडिओमध्ये बोलले असल्याचे स्पष्ट होत आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही. ती क्लिप माझी नाही, ती कुठली आहे हे मला माहीत नाही. माझा त्या ऑडिओ क्लिपशी काही संबंध नाही. मी अशी कोणाकडेही मागणी केलेली नाही.
गायत्री सौंदाणे, तहसीलदार पारनेर.