सुपा (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यास करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आतापर्यंत पोलीस ठाण्यातील सहा कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे.
सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 महसुली गावांसह दोन औद्योगिक वसाहती व तीस किलोमीटरचा महामार्ग येतो. या सर्व क्षेत्रासाठी सुपा पोलीस ठाण्यात दोन अधिकाऱ्यांसह तीस कर्मचारी आहेत. त्यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या सहा आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हा पोलिस ठाण्यातील 50 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सुटीवर पाठवण्यात आले होते. त्यातच आतापर्यंत एक अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. दोन कर्मचारी रजेवर असतात. त्यामुळे नागरिकांचे संरक्षण करणे व कायदा सुव्यवस्था राखताना या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सुपा परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. महामार्गावर रोजच आपघातासह हाणामाऱ्यांचे प्रकार होत आहेत. दोन्ही औद्योगिक वसाहतीत नेहमीच ठेकेदारीवरून टोकाचा संघर्ष आहेच.
या सगळ्यांतूनही हे अधिकारी व कर्मचारी मार्ग काढत आहेत. परंतु आता सुपा परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याचा धोका होऊ लागला आहे. त्यामुळे आतापर्यंत सहा कर्मचारी बाधित झाले आहेत. कर्तव्य पार पाडत असताना त्यांना आपल्या परिवाराला वेळ देता येत नाही, तर काही कर्मचारी सुरक्षितता म्हणून घरीच जात नाहीत. सुपा पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्य बळ आहे. त्यामुळे कर्मचारी वाढवून द्यावेत, ही जुनीच मागणी आहे. परंतु याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे करोना पाठोपाठ वाढलेली गुन्हेगारीचे संकट पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
सुपा पोलीस ठाण्यास अजून दुय्यम अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. आज घडीला करोनाने आजारी, ज्येष्ठांना सक्तीची रजा व काही थोडे फार वैयक्तीक अडचणीमुळे रजेवर असल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
राजेंद्र भोसले ,पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस ठाणे