विखे, थोरात, पिचडांनी पळविले पाणी

चकोर यांचा आरोप; जिरायती भागाला मुद्दाम वंचित ठेवण्याचा प्रयत्न

संगमनेर – निळवंडे-भोजापूर ही धरणे जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी उभारली आहेत; पण येथील प्रस्थापित नेत्यांनी या पाण्याचा थेंब गेल्या चाळीस वर्षांपासून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळू दिला नाही, असा आरोप पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्‍चंद्र चकोर यांनी केला. या धरणांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी संयुक्त लढा उभारावा, असे आवाहन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी चकोर सध्या या परिसरात शेतकऱ्यांच्या बैठका घेत आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, राहाता, राहुरी या तालुक्‍यांना निळवंडे धरणाचे पाणी मिळणार आहे. बांधून तयार असलेल्या या धरणात चार वर्षांपासून पूर्ण क्षमतेने पाणी अडविणे सुरू आहे; पण कालव्यांची कामे नसल्याने जिरायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना अद्यापही पाणी मिळत नाही. अशीच अवस्था भोजापूर धरणाखालील शेतकऱ्यांची झाली आहे.

सिन्नर आणि संगमनेरच्या जिरायत शेतकऱ्यांसाठी या धरणाची निर्मिती झाली; पण या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे सरकार दरबारी धूळखात पडून आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तळेगाव, निमोण परिसरात ‘भोजापूर’चे पाणी मिळत नाही. या पाण्यासाठी गेली चार दशके संघर्ष सुरू आहे; पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. या पार्श्‍वभूमीवर चकोर यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी ते गावा-गावांत बैठका घेत आहेत.

चकोर यांनी राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व मधुकरराव पिचड या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, “”निळवंडे, भोजापूर ही धरणे जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी उभारली आहेत; पण येथील प्रस्थापित नेत्यांनी या पाण्याचा थेंब गेल्या चाळीस वर्षांपासून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळू दिला नाही. पाण्यावाचून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. जिरायत भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले, तर ते बागायतदार होऊन सधन होतील. त्यामुळे आपल्या वाड्यावर-बंगल्यावर येणार नाहीत, याची मोठी भीती या प्रस्थापित नेत्यांना वाटते आहे. ही राजकीय मंडळी जिरायत भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळू देत नाहीत. पाण्याचे गाजर दाखवून निवडणुका जिंकायच्या व मूळ प्रश्न तसाच भिजत ठेवायचा, असे घाणेरडे राजकारण दीर्घकाळ सुरू आहे.

निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांमधून नेण्याची सरकारी मंजुरी असताना हे पाणी बंद पाइपमधून नेण्याची मागणी अकोल्याचे नेते करतातच कशी? बंद पाइपची योजना फायदेशीर नाहीच; उलट मोठी खर्चिक आहे; पण मुद्दाम असे अडथळे आणले जात आहेत. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी संयुक्त लढा उभारला पाहिजे. या लढ्यात मी तुमच्या सोबत आणि अग्रभागी असेन.”

जिजाबापू आहेर, शिवपालसिंह ठाकूर, ज्येष्ठ नेते गंगाधर कांडेकर, किसन चत्तर, भाऊसाहेब नवले, राजू सोनवणे, शिवनाथ आहेर, माधव गिरी, केशवराव जाधव, कामगार संघटना अध्यक्ष बाबूराव पवार, शांताराम सानप, रामनाथ फड आदी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिरायत भागातील शेतकऱ्यांनी पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा उचलून संघर्ष करण्याचा निर्णय घेतल्याने प्रस्थापित नेत्यांना याची मोठी डोकेदुखी ठरणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)