अहमदनगर : राठोड यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले : गडाख

सर्वपक्षीय नेत्यांनी दिला राठोड यांच्या आठवणींना उजाळा
नगर (प्रतिनिधी) –
कट्टर शिवसैनिक अनिल राठोड यांच्या निधनाने पक्षाची व जिल्ह्याची मोठी हानी झाली. मात्र, त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्यांचे कार्य पुढे नेले तरच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. राठोड यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती न भरून येणारी आहे. सर्वसामान्याना आधार देण्याचे काम त्यांनी केले, असे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले.

नगर शहरात तब्बल 25 वर्षे आमदारकी केलेले शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार स्व. अनिल राठोड यांच्या श्रद्धांजली सभेत सर्वपक्षीयांनी बुरुडगाव येथील नक्षत्र लॉन येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी विक्रम राठोड, माजी आमदार विजय औटी, भाऊ कोरगावकर, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, भाजप शहराध्यक्ष महेंद्र गंधे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाबूशेठ टायरवाले, डॉ. सर्जेराव निमसे, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, अभिषक कळमकर आदी उपस्थित होते.

यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर म्हणाले की, अनिल भैय्या यांच्या कार्याचा ठसा व त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्या नावाने चरित्रग्रंथ व्हावा, अशी आपली कल्पना आहे. शिवसैनिकांनी त्यांच्याकडे असलेले जुने फोटो, आठवणी व साहित्य शिवसेनेकडे द्यावे. त्यातून त्यांचा ग्रंथ आपल्याला करता येईल. ही त्यांची आठवण कायम आपल्या स्मरणात राहील. जनता जनार्दनाची सेवा करणारा नेता आपण गमावला आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, अनिलभैय्या पंचवीस वर्षे नगर शहरामध्ये जनतेसाठी सातत्याने उभे राहिले. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. माणसाने किती पैसे कमावले, यापेक्षा किती माणसं कमावली, असे म्हटले तर राठोड यांच्या कार्यावरून ते लक्षात येईल. अनेक संघर्षातून त्यांनी जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला. अभय आगरकर म्हणाले की, शहराच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जनतेचा विश्वास त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होता. शहरातील प्रश्नासंदर्भात आम्ही एकत्र बसणार होतो. मात्र ही बैठक होऊ शकली नाही, याची मला खंत वाटते. राजकीय प्रवासात अनेक घडामोडी घडल्या. मात्र, त्यांनी मनामध्ये कधी कटुता ठेवली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.