सावट टंचाईचे……

File photo

जिल्ह्यातील चित्र : लाभक्षेत्रात काही ठिकाणी पाऊस, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात घट

नगर – मध्यंतरीच्या काळात पावसाने मोठ्या कालावधीसाठी ओढ दिल्याने पिके धोक्‍यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पिके कशीबशी तगली आहेत. लाभक्षेत्रात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण घटल्याने धरणांतील आवक मंदावली. त्यामुळे सध्या तरी टंचाईचे सावट गडद होण्याची शक्‍यता आहे. गेली दोन वर्षे समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र गेल्यावर्षीच्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी झालेल्या पावसात जवळपास 35.01 टक्‍क्‍याने घट दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात याहीवर्षी सरासरीइतकाच पाऊस झाला. त्यामुळे धरण 100 टक्‍के भरले. मात्र अकोले तालुक्‍याच्या आकडेवारीकडे पाहता गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 143.84 टक्‍के पाऊस झाला होता, तर यंदाची सरासरी 106.36 इतकी आहे. संगमनेर तालुक्‍यात मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 15 टक्‍क्‍यांनी पावसाचे प्रमाण वधारल्याचे दिसते. तर कोपरगावमध्ये हेच प्रमाण 2.5 टक्‍क्‍यांवर आहे. या व्यतिरिक्‍त श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहाता, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेड आदी तालुक्‍यांमध्ये पावसाच्या सरासरीत मोठी घट दिसते.

वास्तविक पाहता, नगर जिल्ह्याच्या काही भागात परतीचा पाऊसच चांगल्या प्रमाणात होतो. या भागाची भिस्त ही परतीच्या पावसावरच अवलंबून आहे. मात्र त्या काळात पावसाच्या सरासरीत घट आल्यास जिल्ह्यात टंचाईचे संकट उभे राहू शकते. जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण आठ प्रकल्प आहे. गेल्यावर्षी एक दोन प्रकल्प वगळता बाकी सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर होते. मात्र यंदा भंडारदरा वगळता बाकी सर्व प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक घटल्याचे चित्र दिसते आहे. मंडलनिहाय पर्जन्यमानाच्या आकडेवारीकडे पाहता जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. अकोले तालुक्‍यातील राजूर, शेंडी, साकीरवाडी येथे तुरळक प्रमाणात पाऊस झाल्याचे दिसते.

कर्जतला सरासरीच्या 27 टक्‍केच पाऊस…

यंदा जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यात पावसाची सरासरी सर्वात कमी आहे. ती केवळ 27.62 टक्‍के आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला कर्जत तालुक्‍यात पावसाची सरासरी ही 105.62 इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 75 टक्‍के सरासरी घटल्याचे दिसते. राहाता तालुक्‍यातही पावसाच्या सरासरीत 50 टक्‍क्‍याची घट आहे.

आढळातही अल्प पाणी…

अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात मात्र जवळपास 14 टक्‍क्‍यांची घट दिसते, तर आढळा धरणातही गेल्या वर्षीपेक्षा पाण्याची आवक सुमारे 48 टक्‍क्‍यांनी घटली आहे.

सर्वाधिक पाऊस शेंडीला…

आतापर्यंत झालेल्या पावसात अकोले तालुक्‍यातील शेंडी येथे सर्वाधिक म्हणजे 3 हजार 324 मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल साकीरवाडी येथे 836 मिमी, राजूर येथे 685, अकोलेत 525 मिमी अशा पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)