संगमनेर – शहरात विविध ठिकाणी घरगुती गॅसचा वापर हा व्यवसायिक कारणासाठी अर्थात चारचाकी वाहनांमध्ये भरण्यात येत आहे. हा घरगुती गॅस अवैध मार्गाने रिफिलिंग करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती संगमनेर पोलिसांनी मिळाल्यानंतर अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी छापे मारून साहित्य जप्त केले.
पोलिसांनी आज सकाळी 9 वाजता संगमनेर शहरातील विविध ठिकाणी एकूण चार टीम तयार करून पाठविल्या होत्या. पाठवण्यात आलेल्या ठिकाणांपैकी तीन ठिकाणी बेकायदेशीरपणे घरगुती वापराचा गॅस रिफिलिंग करून व्यवसायिक वापरासाठी वापरत असल्याचे, तसेच बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये मॉडिफिकेशन करून वाहनांमध्ये हा गॅस भरत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे या बेकायदेशीर कृत्यासाठी वापरात असणारी सर्व साधने, गॅस सिलेंडर, रिफीलिंगसाठीची मशिनरी इत्यादी जप्त करण्यात आले. संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदरचा प्रकार हा बेकायदेशीर असून यामुळे स्फोट होण्यासारखी गंभीर दुर्घटना घडवून आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे.
===================