36 कोटींच्या ठेवी
नेवासा फाटा – सभासद हिताची जपवणूक करत समाजाच्या हितासाठी मौलिक योगदान देत असलेल्या नेवासा येथील लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील पतसंस्थेला 31 मार्चअखेर सर्व तरतुदी करून 41 लाख 35 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, संस्थेच्या एकूण 36 कोटींच्या ठेवी असून गेल्या वर्षात 3 कोटी 18 लाख इतक्या ठेवींमध्ये वाढ झालेली आहे. पतसंस्थेची गुंतवणूक 13 कोटी 50 लाख इतकी असून आतापर्यंत पतसंस्थेने 26 कोटी 36 लाख इतके कर्जवाटप गरजूंना केले आहे. संस्थेने 100 टक्के एनपीएची तरतूद केली असून 69.80 टक्के इतका घुले पाटील पतसंस्थेचा सीडी रेशो आहे.
पतसंस्थेने करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात हलाखीची परिस्थिती असतांना देखील सभासद व खातेदारांना चांगली सेवा दिलेली आहे.पतसंस्थेकडून ग्राहकांसाठी आर.टी.जी.एस.सुविधा, सोने तारण कर्ज योजना, लाईट बील भरणा केंद्र, वाहन तारण कर्ज, वयक्तिक कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज व इतर विविध योजना सुरू केल्या असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या हितासाठी सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. नेवासा शहराच्या वैभवात भर घालणारी पतसंस्थेची स्वमालकीची इमारत उभी राहिली असून स्वभांडवली ही पतसंस्था आहे. विनम्र व तत्पर सेवा देणारी पतसंस्था म्हणून या पतसंस्थेचा नावलौकिक आहे.