चालूवर्षी गाळप होणाऱ्या उसाचा दर जाहीर करा
पारनेर – मागील वर्षीचे २०० टनाप्रमाणे पैसे द्या, चालूवर्षी गाळप होणाऱ्या उसाचा दर जाहीर करा, चालू हंगामाचा दर जाहीर करून मगच ऊस तोड सुरू करावी. दोन्ही मागण्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, या मागणीचे निवेदन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे चेअरमन महेश करपे यांना देण्यात आले.
२०२३-२०२४ या गळीत हंगामात देसवडे, मांडवे खुर्द आणि परिसरातून शेतकऱ्यांचा ऊस मोठया प्रमाणात माळकुप येथिल ग्रीन एनर्जी लिमिटेड या कारखान्यास देण्यात आला होता. ऊसाची तोडणी करण्य अगोदर कारखान्याचे एम डी यांनी गावागावात मीटिंग घेऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की, तुमच्या ऊसाला इतर कारखान्याप्रमाणे दर देऊ पण मागील हिशोब बाकी असतानाच चालू हंगामातील ऊसतोड चालू केली आहे.
शेजारील संगमनेर कारखान्याने अंतिम दर ३००० रुपये दिला आहे. आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे उर्वरीत २०० रुपये टनाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्यात यावे. चालू हंगामाचा दर जाहीर करून मगच ऊस तोड सुरू करावी .दोन्ही मागण्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकुडे, दत्ता फटांगरे, मा. चेअरमन संजय भोर, अविनाश भोर, संतोष काकडे, संपत फटांगरे, अण्णा भोर, भाऊसाहेब खाडे, मंजाबापू वाडेकर, बाबासाहेब टेकुडे, रावसाहेब गोळे, महिपती दरेकर, नवनाथ जाधव यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.