दोन दिवस नगरमध्ये थंडीची लाट

किमान तापमान 4.9 अंश सेल्सिअस : तीन दिवसांत पावसाची शक्‍यता

नगर – थंडीची लाट पुढील दोन दिवसात तीव्र होण्याची शक्‍यता आहे. नगरचे किमान तापमान आज 4.9 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे. गेल्या तीन दिवसांत कमाल तापमानात पाच ते सहा अंशांनी घट झाली आहे. दिल्ली, जम्मू-कश्‍मीरमध्ये थंडीची लाट तीव्र आहे. दिल्लीत काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे उत्तरेकडून वेगाने थंड वारे वाहू लागले आहे. परिणामी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवड्यात थंडीची लाट पुढील दोन दिवसात तीव्र होण्याचा अंदाज स्थानिक हवामान अभ्यासकांनी नोंदविला आहे. दरम्यान, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील काही भागात कडक्‍याची थंडीची लाट होती. मध्य महाराष्ट्र व मराठवड्याच्या काही भागात थंडी कायम होती. ही थंडी दिवसाही जाणवत होती. किमान तापमानात तुलनेपेक्षा उल्लेखनीय घट नोंदवली गेली आहे. कोकण आणि गोवा येथील किमान तापमानात देखील तुलनेपेक्षा उल्लेखनीय घट झाली आहे. राज्यात देखील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 11, 12 व 13 तारखेला पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविलेले गेलेले किमान तापमान खालीलप्रमाणे :

मुंबई 16.8, अलिबाग 13.6, रत्नागिरी 14.8 पणजी 18, पुणे 6.2, अहमदनगर 4.9, जळगाव 7.4, कोल्हापूर 15.1, महाबळेश्‍वर 12.2, मालेगाव 6.2, नाशिक 5.0, सांगली 10.4, सातारा 9.4, सोलापूर 13.0, औरंगाबाद 13.6, परभणी 8.5, नांदेड 10.5, बीड 8.5, अकोला 8.5, अमरावती 10.4, बुलढाणा 9.3, ब्रह्मपुरी 7.9, चंद्रपूर 12.2, गोंदिया 12.2, नागपूर 6.3, वर्धा 10.1, यवतमाळ 11.0

Leave A Reply

Your email address will not be published.