शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्थापना पूजा
नगर (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणताही गाजावाजा न करता काल अत्यंत शांततेत गणरायाला नगरकरांनी निरोप दिला. इतिहासात प्रथमच मानाच्या सर्व गणपतींचे पोलीस दलातर्फे धार्मिक सोपस्कार पूर्ण करत विसर्जन करण्यात आले. पोलीस दलाने त्यासाठी विसर्जन रथाची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उत्थापना पूजा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या दारापर्यंत येऊन गणपतीला निरोप दिला. विशाल गणेश मंदिरात बसविण्यात आलेल्या या मूर्तीचे आगरकर मळा येथील विहिरीत विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, नगर शहरात प्रभागनिहाय 21 कुंड महापालिकेने उपलब्ध करून दिले होते. त्या-त्या प्रभाग अधिकाऱ्यांवर विसर्जनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. महापालिकेने त्यासाठी 24 वाहनांची व्यवस्थाही केली होती. काही ठिकाणी ही व्यवस्था कुचकामी ठरली. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकाने नेप्ती नाका चौकात असलेल्या बाळाजी बुवा बारवेत सर्व मूर्तींचे विसर्जन केले.
बहुतेक ठिकाणी जागेवरच विसर्जन
नगर शहरातील घरगुती बाप्पांचे बहुतेक ठिकाणी घरीच विसर्जन करण्यात आले. काही सार्वजनिक मंडळांनी देखील जागेवरच बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले. यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असल्याने ग्रामीण भागात सर्वत्र पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे गर्दीचे नियम पाळून ग्रामीण भागात नद्या व तलावांत बाप्पांचे विसर्जन करण्याची संधी गणेश भक्तांचा मिळाली.