नगर | विवाहित महिलेला पोलिस दलात भरती करण्याचे अमिष दाखवत अत्याचार; तोतया पोलिस ‘जेरबंद’

राहाता – शिर्डी येथील विवाहित महिलेला पोलिस भरतीत मदत करण्याचे अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करणार्‍या तोतया पोलिसाला राहाता पोलिसांनी जेरबंद केले. किरण महादेव शिंदे असे त्याचे नाव असून, तो बीड येथील हिवराफाडा येथील रहिवासी आहे.

पीडित महिला व आरोपीची सोशल मीडियावरील एका अ‍ॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. शिंदे व पीडित महिलेची मिशो अ‍ॅपच्या माध्यमातून ओळख होऊन दोघांची मैत्री झाली. शिर्डी पोलीस स्टेशनला नोकरीस असल्याचे त्याने महिलेला सांगितले होते. पोलीस भरतीत मदत करतो, असे सांगून तू नवर्‍याला सोडून दे माझ्याशी लग्न कर, तुला सुखी ठेवीन, असे सांगून त्याने संबंधित महिलेशी शारिरिक संबंधही ठेवले होते. मात्र, काही दिवसांत महिलेला शिंदे हा पोलीस नसल्याचा संशय आला. त्याबाबत तीने त्याला विचारणा केली. त्यावरून वाद होऊन शिंदे याने महिलेला मारहाण केली होती.

या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे पोलिसाचे बनावट आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले आहेत. या प्रकरणी शिंदेविरुध्द अत्याचार व फसवणूक करणे तसेच तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरे हे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.