डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे मिळणार सहकार्य
राहाता (प्रतिनिधी) – करोना नियंत्रणासाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा उद्योगसमूहाच्या वतीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी सरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या सहकार्याने या टेस्ट करण्यात येणार आहेत. प्रवरानगर येथे कारखाना कार्यस्थळावरील रुग्णालयात या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. अवघ्या काही दिवसांत सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरूवात होणार आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामाचे पूर्व नियोजन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून कारखान्याचे अध्यक्ष आ. विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. गळीत हंगाम सुरू होणार असल्याने कारखान्यातील कामगारांच्या आरोग्याबाबत त्यांना स्वतःला आणि व्यवस्थापनाला माहिती असावी, या उद्देशाने हा उपक्रम घेतला असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विखे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम या तपासणीसाठी नेमण्यात आली आहे. रोज 250 ते 300 कामगारांची टेस्ट घेतली जाणार असून, अहवाल आल्यानंतर कामगारांना आरोग्यासंदर्भात पुढील मार्गदर्शनही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.