लसीकरणात गोंधळ…! पहिल्या की, दुसर्‍या डोसवरुन कर्मचार्‍यांत संभ्रमाची स्थिती

नगर – सरकारच्या निर्देशानुसार एक मेपासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांचेच लसीकरण सुरु करण्यात आले आहेत. तथापि, लसीच्या उपलब्ध साठ्यावरुन नगर महापालिकेचे कर्मचारीच संभ्रमात पडले आहेत. लसीचा आता पहिला डोस द्यायचा की दुसरा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडलेला आहे. त्यावरुन नगर शहरात लसीकरणात मोठाच गोंधळ उडत आहे.

महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नागरीकांना सर्रासपणे दुसरा डोस द्या, अशा सूचना दिल्या आहेत. पहिला डोस लसीचा जास्त कोटा मिळाल्यानंतर पुन्हा सरु करता येईल, असे निर्देश आयुक्तांनी दिल्याची माहिती काल मुकुंदनगर येथील आरोग्य कर्मचारी पाचारणे यांनी तेथे लसीकरणासाठी आलेल्या नागरीकांना दिली. त्यामुळे लसीकरणासाठी नोंदणी झालेली असतानाही पहिल्या डोससाठी आलेल्या अनेकांना माघारी जावे लागले.

विशेष म्हणजे या नागरीकांनी सरकारी पोर्टलवरच लस घेण्यासाठी नोेंदणी केली होती. त्यांना लसीकरणासाठी तारीखही देण्यात आली होती. त्यात काही ज्येष्ठ नागरीकांचाही समावेश होता. तथापि, कर्मचार्‍यांनी त्यांच्या नोंदणीकडेही दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रत्येक लसीकरण केंद्रावर आज सकाळपासून रांगा लागलेल्या होत्या. भल्या सकाळी रांगेत उभे राहिले, तरी नंबर येईपर्यंत लस संपल्याची माहिती कर्मचारी देतात. त्यातून नागरीकांचा आज पारा चढला होता.

माळीवाडा भागातील महात्मा फुले आरोग्य केंद्रात आज असाच गोंधळ उडाला. ऐनवेळी लस संपल्याचे सांगितल्याने रांगेच उभे असलेले नागरीक चिडले. त्यांनी तेथेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता-रोको आंदोलन पुकारले. यामुळे कर्मचार्‍यांचीही थोडावेळ पळापळ झाली. परंतु, आंदोलन करुनही अखेरपर्यंच लस उपलब्ध झालीच नाही. त्यामुळे स्थानिक नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता लसीसाठी उद्या रांगेत थांबायचे का? असाही प्रश्‍न अनेकांना पडला होता.

अनेकांना नोंदणीतच अडचणी : जगताप
18 ते 44 वयोगटातील अनेकांकडे एकतर मोबाईलच नाहीत किंवा साधे मोबाईल आहेत. अनेकजण अशिक्षित आहेत. ऑनलाइन पद्धतीने त्यांना नोंदणी करता येत नाही. त्यामुळे नोंदणीतच अडचणी असल्याची तक्रार नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यात सुधारणा करुन लसीकरण केंद्रातच नोंदणीसाठी कक्ष उघडण्याची मागणीही आमदार जगताप यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.