श्रीरामपूर येथे लोकशाही चर्चासत्राचे आयोजन
नेवासा : भारतीय राज्यघटनेत मतदानाचा अधिकार महत्त्वाचे तत्त्व म्हणून समाविष्ट आहे. नागरिकांनी मतदार नोंदणीबाबत जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.
श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘लोकशाही चर्चा’ या चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपविभागीय अधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आदी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करून घ्यावी. मतदान यादीत नाव असेल तर मतदान ओळखपत्राशिवाय इतर १३ प्रकारातील ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राच्या आधारे मतदान करता येते.
आदिवासी भागात आज मतदानाची टक्केवारी जास्त आहे, मात्र शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे. शहरातील मतदारांनी अधिक सजग राहून मतदानाचे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी स्वतः व ओळखींच्या लोकांमध्ये मतदार जागृती केली तर निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढणार आहे.
लोकशाही प्रक्रियेत मतदानाबरोबरच समाजातील वातावरण निकोप ठेवणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. सी-व्हिजील अॅपच्या माध्यमातून नागरिकांना निवडणूकविषयक आचारसंहिता व प्रक्रियेविषयी ऑनलाईन तक्रारी करता येतात. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष राहणार आहे. प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून पोलीसांना व प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री.कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, तृतीयपंथीय समुदायाची मतदार म्हणून नोंदणी करण्याबरोबर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करत आहे. मतदारांनी सामान्य रहिवास असलेल्या ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदणी करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. एका मतदारसंघात एकाच वेळी कितीही उमेदवार निवडणूकीस उभे राहिले तरी ईव्हीएम यंत्रावर निवडणूक आयोग मतदान घेण्यास सक्षम असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्ह्यात कुठेही तडजोड केली जाणार नाही. निवडणूकीच्या काळात समाजविघातक कृत्यांबाबत नागरिकांनी विशेष दक्ष राहावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ईव्हीएम रथांच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ यंत्राविषयी नागरिकांच्या शंकाचे समाधान करण्यात येत आहे. या ईव्हीएम रथांना भेट देऊन नागरिकांनी ईव्हीएम यंत्राविषयी तांत्रिक माहिती जाणून घेऊन शंकाचे समाधान करून घ्यावे.
जिल्ह्यातील १२० महाविद्यालयात नवीन मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे १८ वर्ष पूर्ण झालेले नवीन ५० हजार मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांचे अधिकार व कर्तव्यावर गावागावात चर्चा होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी व्यक्त केली.
‘स्वीप’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. बाल शाहीर कु.ओवी काळे हीने लोकशाहीवर पोवाडा सादर केला. भि.रा.खटोड कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी लोकशाहीवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण केले. प्रास्ताविकात सावंत यांनी उपक्रमाची माहिती दिली.