कर्जत – तालुक्यातील कापरेवाडी शिवारात शुक्रवारी संध्याकाळी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि भरारी पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर डंपर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत वाहन बाजूला केल्याने तहसीलदारासह पथकातील कर्मचारी बचावले. डंपरचा पाठलाग करून पथकाने त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी चालक, मालक व क्लीनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना कापरेवाडी शिवारात अवैध आणि विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. तहसीलदार आगळे यांनी पथकासह कापरेवाडी गाठले. पथकाने डंपर तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. आगळे यांनी डंपर तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. चालक डंपर कर्जतच्या दिशेने घेत असताना चालकाच्या भ्रमणध्वनीवर वाहनमालकाचा फोन आला असता त्याने डंपर कर्जतला घेवून जाण्यास मज्जाव केला.
चालकाने डंपर भरारी पथक असलेल्या वाहनाच्या विरुद्ध दिशेने घेत तहसीलदार असलेल्या वाहनाच्या अंगावर घालत कापरेवाडीहुन शिंदेवाडीमार्गे टाकळी खंडेश्वरीकडे वळवला. तहसीलदार आगळे यांनी तब्बल २२ किमी डंपरचा पाठलाग करीत वाहनचालक आणि क्लिनर यास ताब्यात घेतले.
तलाठी गणेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संबंधित वाहनमालक विनोद उर्फ आबा दादा कदम (रा. माहीजळगाव), वाहनचालक लक्ष्मण भुजंग काळे (रा. वालवड) , क्लिनर शुभम भाऊसाहेब मंडलिक (रा सितपुर) यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार यांच्या अंगावर डंपर घालण्याच्या घटनेचा महसूल कर्मचाऱ्यांना निषेध केला आहे.