राजश्री घुले पाटील; जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी
चार कर्मचाऱ्यांचे अहवाल आले पॉझिटिव्ह
मुख्यालयातील 290 कर्मचाऱ्यांचे घेतले स्वॅब
नगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांत करोना विषाणूचा फैलाव वाढू नये, यासाठी कर्मचारी संघटनेने केलेल्या मागणीनुसार आज करोना चाचणी करण्यात आली. करोना विषाणूच्या संशयाने प्रत्येकजण दबावाखाली कामावर येतोय. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, म्हणून ही गरज होती. आता चाचणीमुळे दबाव कमी होईल. सर्वांनीच आता करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांनी केले.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सभागृहात कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनील गडाख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, साथरोग अधिकारी दादासाहेब साळुंके, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, सचिव किशोर शिंदे, शिवाजी भिटे यांनी चाचणीच्या उपक्रमाचे नियोजन केले.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर म्हणाले, “”मुख्यालयात काम करणारांमध्ये संशयाचे वातावरण होते. कर्मचारी युनियनने सातत्याने चाचणीची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक व्यवस्था करून सर्वांची करोना चाचणी करून घेतली. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमधील भीती कमी होवून ते निर्धोकपणे आपले कर्तव्य बजावू शकतील.’ उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विकास साळुंके यांनी विचार मांडले. दिवसभरात 290 कर्मचाऱ्यांपैकी तपासणी केली. त्यात चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. अन्य कर्मचारी निगेटिव्ह आहेत.