अहमदनगर : खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दुधामध्ये भेसळ करणाऱ्या खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन व शितकरण केंद्र या पेढी विरुद्ध बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली .

अन्न व औषध प्रशासनाने 8 जुलै 2021 रोजी शिवकृपा दूध संकलन शितकरण केंद्र, खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर येथून टँकर क्रमांक  MH 11- AL  5962  मधून बारामती येथे गाय दुधाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून उर्वरित साठा सुमारे 8 हजार लिटर नष्ट केले. बारामती पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ व संजय नारागुडे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, शुभांगी अंकुश तसेच जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाचे पर्यवेक्षक राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गाय दुधाचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये डिर्टजंट व ग्लुकोजची भेसळ आढळून आल्याने या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णे यांनी बारामती ग्रामीण पोलिस स्थानक येथे 21 सप्टेंबर 2021 रोजी वैभव दत्तात्रय जमकावळे व संपत भगवान ननावरे यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील कलमांचे उल्लंघन केले असल्याने प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) दिला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक महेश विधाते करीत आहेत.

अन्न व्यवसायिकांना कायद्याचे तंतोतंत पालन करून निर्भेळ दुध विक्री करावी. दुधात भेसळ करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. भेसळीबाबत अथवा अन्न पदार्थ, औषधाच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 , दुरध्वनी क्रमांक  020-25882882 अथवा कार्यालयीन ई मेल [email protected] यावर तक्रार नोंदवावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.