जामखेड – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. मुंबईहून बीडला निघालेल्या सागर ट्रॅव्हल्सचा आष्टी शहरापासून बारा किमी अंतरावर असलेल्या आष्टा ह.ना.गांधनवाडी फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 5 ठार झाले असून, 23 जण जखमी झाले. दुसरा अपघात बीड-कल्याण महामार्गावर झाला. रुग्णांना धामणगांववरून नगर येथे उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात होऊन डॉक्टरासहित 4 जण ठार झाले.
मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सचा आष्टा ह.ना गांधनवाडी फाट्याजवळ अपघात झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 45 ते 50 प्रवासी यातून प्रवास करत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येते. पहाटेच्या सुमारास सागर ट्रॅव्हल्स (एन. एल.01 बी.2499) मुंबईहून बीडच्या दिशेने येत असताना आष्टा हरिनारायण गांधनवाडी येथे वळण घेताना हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल 100 ते 150 फूट घसरत गेली.
यामध्ये धोंडीबा यशवंत शिंदे (वय 36 रा. भिल्लारवाडी, पो. जाटनांदूर ता. शिरूर जि. बीड), देविदास दत्तू पेचे (रा.सौताडा ता. पाटोदा जि.बीड), अशोक महादेव भोंडवे पिट्टी (नायगाव ता.पाटोदा जि. बीड), महमद आसिफ दोस्त महमद खान (रा.कुर्ला मुंबई पश्चिम) व रवी यादव गोंडवे (वय 28, मोतीनगर डिग्रस ता.पुसद जि.यवतमाळ) या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. आष्टी आणि जामखेड, अहमदनगर येथे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. गंभीर प्रवाशांना नगर येथे हलविण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (एम.एच.21 एक्स 8600) हा धामणगावकडून नगरकडे जात होता. रात्री 11 वाजेदरम्यान व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेने (एम.एच.16 क्यू.9507) जोरदार धडक दिली. यामध्ये सांगवी पाटण येथील डॉ. राजेश झिंजुर्के (वय 38), रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे (रा.धामणगाव), मनोज पांगु तिरखुंडे, पप्पु पांगु तिरखुंडे (दोन्ही रा.जाटदेवळा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एका जखमीवर उपचार सुरू आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते.
आ. सुरेश धसांची मदतीसाठी घटनास्थळी धाव
दरम्यान, अपघाताची माहिती कळताच भाजपा आमदार सुरेश धस हे स्वत: घटनास्थळी हजर राहून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. जवळच्या गावांत फोन फिरवत तत्काळ अपघातस्थळी मदतीसाठी नागरिकांना बोलवून जामखेड, आष्टी, गंभीर जखमींना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. धामणगाव येथील घटनेची माहिती मिळताच दूरध्वनीवरून मदत करत सहकार्य केले.