शेवगाव – तालुक्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या ढोरजळगाव शाखेत सायंकाळी दिवसभराचा हिशोब जुळविताना ५० हजार रुपये अधिक आल्याचे लक्षात आले. या शाखेचे रोखपाल सचिन शिरसाठ व शाखाधिकारी संजय फलके यांनी ती रक्कम संबंधित खातेदाराचा शोध घेऊन परत केली. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
ढोरजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १५ आॅक्टोबरला बँकेत ग्राहकांची गर्दी असल्यामुळे आदिनाथ नागरगोजे या खातेदाराचे नजर चुकीने स्वत:च्या बँक खात्यात ५ लाख रुपये भरत असताना ५० हजार रुपये जास्त गेले. ५० हजार रुपये जास्त आल्याचे रोखपाल शिरसाठ व शाखाधिकारी फलके यांच्या लक्षात आल्यावर ते कोणाचे असावेत, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. दिवसभराच्या ग्राहकांची चौकशी व खात्री करून नागरगोजे यांचा जास्तीचा भरणा आल्याचे लक्षात आल्यावर फोनवरून खात्री केली असता संबंधित ग्राहक माझे पैसे नाही म्हणाले.
मात्र ,नंतर नागरगोजे यांना बँकेत बोलावून घरी जाऊन खात्री करण्याची कल्पना देण्यात आली. त्यांनी घरी जाऊन खात्री केली असता ती पन्नास हजार रूपये रक्कम आपलीच आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यावर शाखाधिकारी फलके यांनी सर्व माहिती घेऊन शेतकऱ्याला त्यांची जास्तीची रक्कम परत केली. एवढी मोठी रक्कम बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली म्हणून नागरगोजे यांनी बँकेच्या संजय फलके, सचिन शिरसाठ, श्रीकांत मुंढे, नितीन कर्डीले या सर्वांचा सत्कार केला. परिसरात शिरसाठ व फलके यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.