आज 75 जणांचे अहवाल निगेटिव्ह
नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 105 रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 25 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी 8 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी बापूसाहेब गाडे यांनी दिली आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे.
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एक, तर श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव, कोळगाव, अजनूज, देवदैठण येथील प्रत्येक एक बाधित अढळला असून, घारगावातील तिघांचा समावेश आहे. आज सकाळी 75 रुग्णांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज बाधित आढळलेल्या रुग्णांसह उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 516 इतकी झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये नगर ग्रामीण तीन, नगर शहर 38, नेवासे तीन, पारनेर दहा, राहाता आठ, पाथर्डी सहा, भिंगार सहा, राहुरी एक, संगमनेर सहा, श्रीगोंदा दोन आणि श्रीरामपूर येथील 22 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 25 झाली आहे.