लिप्टचा बहाणा करून महिलेने दोघांना लुटले

नगर (प्रतिनिधी) – नगर शहरामध्ये मनमाड रोड आणि महावीर नगर परिसरात एक महिलेने लिप्टचा बहाणा करून टेम्पो चालक व दुचाकीस्वाराला लुटले. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे.

सुनीता भाऊसाहेब भगत (रा. काळेवस्ती, जेऊर ता. नगर) असे संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. याबाबत विजय किसन चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री विजय चौधरी टेम्पो घेऊन मनमाड रस्त्याने एमआयडीसीकडे जात असताना मिस्कीनमळा येथे एका महिलेने टेम्पो हात केला आणि हुंडेकरी लॉनपर्यंत सोडण्याची विनंती केली. ती महिला टेम्पो बसली.

हुंडेकरी लॉनजवळ टेम्पो गेल्यानंतर चौधरी यांनी तिला उतरण्यास सांगितले. त्यावेळी तिने पैसे देण्यासाठी पाचशे रुपयांची नोट काढली. सुटे पैसे नसल्याने वादावादी करू लागली. टेम्पोच्या खाली उतरून शिवीगाळ व दमदाटी करू लागली. येथेच थांब आमचे लोक बोलविते, असे म्हणून चौधरी यांच्या खिशातील सतराशे रुपये बळजबरीने काढून घेतले. याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकाने त्या महिलेचा शोध घेऊन सावेडी बसस्थानकावरून महिलेला ताब्यात घेतले.

दरम्यान, याच महिलेने शांतिलाल कपुरचंद भंडारी यांनाही लिप्ट मागून महावीरनगर येथे बाराशे रुपयांना लुटले. ही कारवाई उपनिरीक्षक सोळंके, पोलीस कर्मचारी बार्शिकर, जावेद शेख, अनिकेत आंधळे, संतोष राठोड, शैलेश गोमसाळे, चित्रलेखा साळी, संपदा तांबे, सायली भिंगारदिवे यांच्या पथकाने केली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.