निलंबन उठवून अहिरे यांची शासकीय सेवेत पुन:स्थापना ; लाच प्रकरणावर चार महिन्यातचं पडदा

पुणे : शालेय शिक्षण विभागातील पुणे विभागीय प्रभारी शिक्षण उपसंचालक तथा सहायक संचालक प्रविण अहिरे यांच्यावरील निलंबन चार महिन्यातचं उठविण्यात आले असून आता त्यांची वर्धा जिल्हा परिषदेत निरंतर शिक्षणाधिकारी या पदावर पुन:स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एका शिपायाला 26 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले होते. लाचेच्या सापळ्या प्रकरणी अहिरे यांना 10 फेब्रुवारी 2020 रोजी अटक करण्यात आली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता. याबाबत एसीबीने शिक्षण आयुक्तांकडे अहवालही सादर केला होता. त्यानुसार हा अहवाल कार्यवाहीसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता.

शासनाने मार्चमध्ये अहिरे यांना निलंबित करण्याची कार्यवाही केली होती. अहिरे यांच्या निलंबनास तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुध्द न्यायालयात अभियोग दाखल करण्याचा प्रस्ताव व विभागीय चौकशी सुरु करण्याचा प्रस्ताव शासनास अप्राप्त आहे. त्यामुळे निलंबन आढावा समितीने अहिरे यांचे निलंबन उठवून त्यांना पुन:स्थापित करण्याबाबत शिफारस केली होती.

अहिरे यांच्याविरुध्द प्रलंबित न्यायालयीन व विभागीय चौकशी प्रकरणी अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून त्यांचे निलंबन उठवून पुन:स्थापना देण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी नुकतेच काढले आहेत.

त्यानुसार शिक्षण आयुक्तालयातील प्रभारी शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनीही अहिरे यांना आदेश बजाविले आहेत. अहिरे यांनी पुन:स्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे व संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांना रुजू करुन घ्यावे. रुजू झाल्यानंतर रुजू अहवाल शासनास व शिक्षण आयुक्तालयास तात्काळ सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.