Ahilyanagar Accident News : राज्यातील अपघातांचे सत्र सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व श्रीरामपूर येथील एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे श्रीरामपूर परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. मृतांची नावे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाहीत. काल श्रीगोंदा तालुक्यात चार जणांचा मृत्यू दरम्यान, काल श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. घारगाव-कोळगाव रोडवरील माऊली मंदिराजवळ ट्रक आणि इको कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात नितीन कोकाटे (कारचालक), गजानन पायघन, ध्रुपता पायघन आणि वैभव पायघन यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. करण पायघन हा १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग दोन दिवसांत झालेल्या भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.