नाशिक : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक जिल्हा बँकेच्या 25 माजी संचालकांना बँकेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 25 पैकी अनेक जण नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे बडे राजकीय नेते आहेत.
खासदार शोभा बच्छाव, आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार राहुल ढिकले, आमदार डॉक्टर राहुल आहेर या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता आढळल्याचे हे प्रकरण आहे. कलम 88 अंतर्गत अडीच वर्षाची चौकशी केल्यानंतर संशयास्पद कर्ज वितरित केल्याप्रकरणी 15 अधिकारीही अडचणीत आले आहेत. येत्या 2 एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार असून सर्वांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, खोट्या कागदपत्रांच्या आधारे चार घरे लाटण्याच्या प्रकरणात 20 फेब्रुवारी रोजी दोन वर्षांचा माणिकराव कोकाटे यांना कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयात उच्च न्यायालयाने मंगळवारी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, कोकाटे यांच्यासह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावून प्रकरणाची सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोकाटे यांच्यावरील अपात्रतेची कारवाई तूर्त टळली आहे.