मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेती संदर्भातील सर्व लाभाच्या आणि अनुदान योजनांसाठी अजित पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरामध्ये मंत्री कोकाटे यांनी ही घोषणा केली आहे.
सध्या राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना तसेच कृषी यंत्र अनुदान. याचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून महाडीबीटी पोर्टल सुरू आहे. या पोर्टलच्या अंतर्गत शेतकरी आपले अर्ज करत असतात. या पोर्टल अंतर्गत केल्या जाणाऱ्या अर्जाची निवड करून शेतकऱ्यांना लाभ दिला जातो.
मात्र मंत्री कोकाटे यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसमोर महाडीबीटी पोर्टल बंद होणार का? असा प्रश्न पडला आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु अजित पोर्टल सुरू झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टल बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वारसा नोंद घरबसल्या करता येणार
नवीन वर्षात राज्य सरकारकडून नागरिकांना एक मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. नागरिकांना आता ऑनलाईन वारसा नोंद करता येणार आहे. नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात- बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.
‘या’ प्रकारे करा अर्ज?
ई-हक्क प्रणाली आधारे नागरिकांना वारसा नोंद करता येईल. ई-फेरफार आधारे तलाठ्यांना हे काम करता येईल.
pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना सहकारी संस्थांना अगोदर लॉगिन करावे लागेल. त्यासाठी अगोदर साईन-अप, नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा उतरवणे, इकरार नोंदी, मयताचे नावे कमी करणे इतर कामे करता येणार आहेत.
ई-हक्क प्रणालीचा वापर करून आठ प्रकारच्या नोंदी घरबसल्या करता येणार आहेत.
घरबसल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. नागरिक स्वतः या प्रणाली आधारे अथवा महा ई-सेवा केंद्रातून अर्ज करू शकतात.
या प्रणालीच्या वापराने तलाठ्यांवरील ताण कमी होणार आहे.
तसेच महसूल प्रशासनाच्या कामकाजामध्ये गतिमानता आणि पारदर्शकता येईल.