वीसगाव खोरे : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात भात शेती केली जाते. या भात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादन आणि कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. सध्या जनावरांच्या खाद्यपदार्थांचे वाढलेले दर आणि दुधाला मिळणारा भाव यांच्यामध्ये मेळ घालताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
चाऱ्याचा गगनाला भिडणारा दर आणि उत्पादन केले जाणारे दूध यांच्यामध्ये मोठी तफावत होत असल्यामुळे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.भोर तालुक्यात प्रामुख्याने भात शेती खरिपाचे पीक घेतल्यानंतर शेतीमध्ये पाण्याच्या अभावामुळे दुसरे पीक घेणे अवघड झाले आहे. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी ज्वारी, हरभरा व गहू ही पिके घेतली जातात. परंतु याचे प्रमाण कमी असल्याने जनावरांना आवश्यक असणारा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे.
शेतकऱ्यांना दुधाला दर कमी मिळतो शिवाय शासनाचे अनुदानही मिळत नाही. पशुधनाच्या चाऱ्याच्या वाढत्या महागाईने दूध उत्पादन करणे पशुपालकांना परवडत नाही. परिणामी, दुधाला मिळणाऱ्या भावापेक्षा पशुधनाच्या खाद्यासाठी मोठा खर्च होत आहे. वाढत्या महागाईने ही दुभती जनावरे सांभाळणेच अवघड झाले आहे. गाईच्या प्रति लीटर दुधाला ३५ रुपये तर म्हशीला ४५ रुपये बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रति लीटर भाव मिळणे अपेक्षित आहे. तरच दुग्ध व्यवसाय परवडेल.
पूर्वी दूध संकलन केंद्रांवर शेतकरी दूध घालण्यासाठी शेतकऱ्यांची रांग लागत असे. सध्या भोर तालुक्यात ग्रामीण भागात बहुतांशी कुटुंबीय महागाईअभावी जनावरे पाळणे परवडत नसल्याने दूध संकलन केंद्रांवर दूध घालण्याऐवजी खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. एकीकडे चारा उपलब्ध होत नाही. दुसऱ्या बाजुला पशुखाद्याचे दर गगनाला भिडले.दुधाला बाजारभाव मिळत नाही.यंदा ज्वारीचे क्षेत्रही कमी झाले. ज्वारीपासून मिळणारा चाराही (कडबा) कमीच आहे. दुधाच्या कमी झालेल्या दरामुळे दुग्ध व्यवसाय आता परवडत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय सोडून आता शेतकरी, पशुपालक आता इतर व्यवसायाचा शोध घेत आहेत.
आपल्या भागात दुग्ध व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीने करत असल्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न यांचा मेळ घालणे अवघड होत आहे. त्यामुळे व्यापारी तत्त्वावर दुग्ध व्यवसाय केल्यास उत्पन्न चांगले मिळू शकते. यामध्ये दूध शेणखत यामधून उत्पन्नाची साधने निर्माण होतात. त्यामुळे व्यावसायिक तत्वावर दूध उत्पादन करणे गरजेचे आहे.
– राजेंद्र शेडगे, दुध उत्पादक संचालक, श्रीराम डेअरी उत्रौली (ता.भोर).