अकोला – आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. कृषी पदवीधारकांना देशाची सेवा करण्याची मोठी संधी आहे. आपल्या क्षेत्रात अथक परिश्रम करुन आपण नवभारताच्या निर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37 वा दीक्षान्त समारंभ आज संपन्न झाला. या सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत राज्यपालांनी नव स्नातकांशी संवाद साधला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यास भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे माजी उपमहासंचालक, करण नरेंद्र कृषी विद्यापीठ जोबनेर, कुलगुरु महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ तथा संचालक गितांजली तंत्रज्ञान व विज्ञान संस्था उदयपूर डॉ. नरेंद्र सिंह राठोर, कुलगुरु डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदिरवाडे, आ. विप्लव बाजोरिया तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य, माजी कुलगुरु डॉ. व्यंकट मायंदे, डॉ.जी.एम. भराडे, डॉ.विलास भाले, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या संबोधनात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, कृषी सेवा आणि शिक्षण हे असे क्षेत्र आहेत जे नेहमीच फलदायी ठरले आहे. कृषी क्षेत्रात अमाप संधी आहेत. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी क्षेत्र आहे. अशाप्रकारे कृषी क्षेत्राला संशोधक, विद्यार्थी, कुशल मनुष्यबळ पुरविणारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जेथे स्थित आहे. त्या अकोला जिल्ह्याचे यामुळेच देशासाठी मोठे योगदान आहे. आपल्या संस्कृतीत कृषी हे क्षेत्र नेहमीच सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. कोरोना काळातही सर्व क्षेत्र बंद पडले असतांनाही केवळ कृषी हेच क्षेत्र अव्याहतपणे सुरु होते, असे त्यांनी सांगितले.
नव्या पदवीधरांना संदेश देतांना राज्यपाल म्हणाले की, कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर आपणास प्राप्त विद्येचा योग्य वापर करावा. यंदाचे वर्ष हे तृणधान्य वर्ष असून तृणधान्य पिकांच्या संशोधनात, त्यांच्यावरील प्रक्रिया पद्धतीत आपण आपले योगदान देऊ शकता. कृषी विद्या क्षेत्रात महिलांनी चांगली प्रगती केली आहे. त्यांचा या क्षेत्रातील योगदानाचा नक्कीच देशाला फायदा होईल, अशा शब्दात त्यांनी महिलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कृषी विद्यापीठांच्या संशोधनाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदवीधारकांनी, संशोधकांनी, विद्यापीठांनी प्रयत्न करावे. त्यासाठी आपली कृषी विज्ञान केंद्र सशक्त करावे,असा सल्लाही त्यांनी दिला.
Adani scam : अदानी घोटाळा प्रकरणामुळे देशाच्या प्रतिष्ठेला बाधा – मायावती
या सोहळ्यात कृषी विद्याशाखा, कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम व आचार्य अशा एकूण ४३२७ पदव्यांचे पदवीदान करण्यात आले. ३० आचार्य पदवीधारक, २३ स्नातकोत्तर तर १९२२ पदवीपूर्व पदवीधारक यांनी समारंभात उपस्थित राहून पदवी प्राप्त केली. त्याच प्रमाणे उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.